तेजस एक्स्प्रेसकडे प्रवाशांची पाठ; जनशताब्दीच्या पाठोपाठ गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 03:36 AM2019-08-09T03:36:20+5:302019-08-09T03:37:32+5:30

आठवड्यातून धावते केवळ तीन दिवस

Travelers back to Tejas Express | तेजस एक्स्प्रेसकडे प्रवाशांची पाठ; जनशताब्दीच्या पाठोपाठ गाडी

तेजस एक्स्प्रेसकडे प्रवाशांची पाठ; जनशताब्दीच्या पाठोपाठ गाडी

Next

मुंबई : कोकणात जाण्यासाठी फायदेशीर ठरणारी वेगवान तेजस एक्स्प्रेस मागील दोन महिन्यांपासून विनाप्रवासी धावत आहे. जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस लागोपाठ धावत असल्याने तसेच तेजसचे भाडे जनशताब्दीपेक्षा दुपटीहून अधिक असल्याने तेजस एक्स्प्रेसकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

जनशताब्दी आणि तेजस या दोन गाड्या एकाच वेळी सुटतात. यासह दोन्हीही चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ या स्थानकांवर थांबतात. त्यामुळे या दोन गाड्यांच्या स्पर्धेत तेजस एक्स्प्रेस रिकामी जाते. तेजस एक्स्प्रेसला खेड, वैभववाडी असे दोन जादा थांबे वाढविले तर, येथील कोकणवासीयांसाठी ती जास्त उपयोगी ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.

पावसाळ्यात प्रवाशांची संख्या कमी असल्याने मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणारी तेजस एक्स्प्रेस अत्यंत कमी प्रवासी घेऊन जात आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना, रेल्वे रुळांवर पाणी साचण्याच्या घटना घडतात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून दोन्ही दिशेकडील मेल, एक्स्प्रेस धिम्या गतीने चालविल्या जातात. यासह पावसाळ्यात प्रवाशांची संख्या कमी असते. त्यामुळे तेजस एक्स्प्रेस रिकामी जाते. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणारी तेजस एक्स्प्रेस फुल्ल होईल, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणाºया मेल, एक्स्प्रेस सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सोयीस्कर होईल. जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस यांच्या वेळेत आणि थांब्यात बदल केला, तर दोन्ही एक्स्प्रेसला याचा फायदा होईल, अशी भूमिका कोकण रेल्वे जागृत संघाच्या वतीने मांडण्यात आली. दरम्यान, तेजस एक्स्प्रेसमध्ये सणासुदीच्या आणि सुट्टीच्या वेळी १ हजार ५० ते १ हजार ११० प्रवासी प्रवास करतात. मात्र आता पावसाळ्यात सरासरी ३०० ते ३५० प्रवासी घेऊन जाते. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसला खूप कमी प्रमाणात महसूल मिळत आहे.

खेड, वैभववाडीत थांबा देण्याची मागणी
जनशताब्दी एक्स्प्रेस दादर ते मडगाव धावते. दादर स्थानकावरून ही गाडी पहाटे ५.२५ वाजता सुटते. कुडाळ येथे दुपारी ०१.२२ वाजता पोहोचते. तर, तेजस एक्स्प्रेस सीएसएमटी ते करमाळी धावते. ही गाडी सीएसएमटीहून पहाटे ५.५० वाजता सुटते. पुढे ती दादर स्थानकावर पहाटे ५.५८ वाजता पोहोचते. कुडाळ येथे दुपारी २ वाजता पोहोचते. साहजिकच जनशताब्दी आधी पोहोचत असल्याने प्रवासी तिलाच प्राधान्य देतात. शिवाय तेजसचे भाडे जनशताब्दीपेक्षा दुपटीहून अधिक आहे. जनशताब्दी दररोज तर तेजस आठवड्यातून तीनदा धावते. तेजसला खेड, वैभववाडी येथेही थांबा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Web Title: Travelers back to Tejas Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.