Join us

प्रवाशांनो, पादचारी पुलाचा करा वापर!

By admin | Published: December 29, 2016 2:36 AM

पादचारी पुलांची असलेली कमतरता, तसेच संरक्षक भिंतीला भगदाड पाडून बनवलेला शॉर्टकट मार्ग इत्यादी कारणांमुळे प्रवाशांकडून रूळ ओलांडण्याचा धोका पत्करला जातो.

मुंबई : पादचारी पुलांची असलेली कमतरता, तसेच संरक्षक भिंतीला भगदाड पाडून बनवलेला शॉर्टकट मार्ग इत्यादी कारणांमुळे प्रवाशांकडून रूळ ओलांडण्याचा धोका पत्करला जातो. यात अनेक प्रवाशांना प्राण गमवावे लागतात. हे पाहता, मध्य रेल्वेने १७ स्थानकांदरम्यान पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलांची एकूण किंमत ही ६0 कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी सर्वात जास्त अपघात हे रूळ ओलांडताना होतात. हे संसदीय समितीच्या पाहणीत समोर आल्यानंतर, अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी रेल्वेकडून नुकताच अहवाल तयार केला असून, मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात २९ ठिकाणे धोकादायक असल्याचे यात नमूद केले आहे. अहवालात अपघात रोखण्यासाठी उपाययोजनाही नमूद केल्या आहेत. त्यानुसार, त्यामुळे मध्य रेल्वेने १७ स्थानकांदरम्यान आणखी काही नवे पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून जवळपास २0 पादचारी पूल असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये करी रोड, दादर, कुर्ला स्थानकात दोन, ठाणे स्थानकात दोन पूल, मुंब्रा स्थानकात दोन, कल्याण, नेरळ, वांगणी,आसनगाव, नाहूर, शिवडी, वडाळा रोड, चेंबूर, मानखुर्द, भांडुप, दिवा आणि लोकमान्य टिळक स्थानकांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)या स्थानकांदरम्यान उभारणार पादचारी पूलपश्चिम रेल्वे : माहीम ते माटुंगा, वांद्रे ते खार, विलेपार्ले ते अंधेरी, जोगेश्वरी ते गोरेगावमध्य रेल्वे : घाटकोपर ते विक्रोळी, नाहूर ते मुलुंड, मुलुंड ते ठाणे, ठाणे ते कळवा (विटावा पूल), ठाणे ते दिवा, ठाणे ते कळवा, कळवा ते मुंब्रा, मुंब्रा ते दिवा, दिवा ते कोपर, कल्याण ते उल्हासनगर, कल्याण ते आंबिवली, अंबरनाथ ते बदलापूर.हार्बर रेल्वे : वडाळा ते जीटीबी, टिळकनगर ते चेंबूर, चेंबूर ते गोवंडी, गोवंडी ते मानखुर्द, मानखुर्द ते वाशी आणि वाशी ते सानपाडा.दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी एमआरव्हीसीकडूनही योजना आखली आहे. त्यासाठी सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले असून, पादचारी पूल, संरक्षक भिंत, कुंपण इत्यादी उपाययोजना केल्या जातील. एमयूटीपी-३ ला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामध्ये या प्रकल्पाचा समावेश आहे.