प्रवाशांना वैद्यकीय सुविधा मिळणार रेल्वे स्थानकांवरच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 04:44 AM2020-02-23T04:44:24+5:302020-02-23T06:51:43+5:30
हेल्थ चेकअप एटीएम बसविणार; ६० रुपयांत १६ प्रकारच्या आरोग्य चाचण्या अवघ्या १० मिनिटांत
मुंबई : रेल्वे प्रवासात प्रवाशाला आरोग्याची समस्या जाणविल्यास, तत्काळ वैद्यकीय उपचार घेण्यासाठी हेल्थ चेकअप एटीएम मशीन बसविण्यात येणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण आठ एटीएम बसविण्यात येतील. याद्वारे प्रवाशांना ६० रुपयांत १६ प्रकारच्या आरोग्य चाचण्या अवघ्या १० मिनिटांत करता येतील.
रेल्वे प्रवासात अनेकदा प्रवाशांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अशा प्रवाशांना तात्काळ उपचार करून घेणे शक्य व्हावे तसेच इतर प्रवाशांनाही आपल्या आरोग्यासंदर्भात आवश्यक तपासण्या कमी खर्चात करण्यात याव्यात यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, बोरीवली आणि मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांवर एटीएम बसविण्यात येईल. प्रवाशांना हेल्थ चेकअप एटीएममधून शरीरातील ऑक्सिजनची मात्रा, वजन कळेल. पल्स रेट, बॉडी टेम्परेचर यांची माहिती मिळेल.
बॉडी मास इंडेक्स, ब्लडप्रेशर, मेटाबॉलिक एज, हायड्रेशन, फॅट, बोन टेस्ट, हाडे, वजन, आंत्र रोग यांची तपासणी केली जाईल. १० मिनिटांत आरोग्याच्या तपासणीचा अहवाल मशीनमार्फत मिळेल. काही कारणास्तव १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागल्यास प्रवाशाला अहवाल ई-मेल आयडीवर पाठविण्यात येईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
विविध आजारांवर सल्ला
प्रवाशांना न्यूरोलॉजी, फुप्फुसांची तपासणी, स्त्री रोग आदी विविध आजारांवर सल्लादेखील मिळणार आहे. यासाठी एटीएमच्या ठिकाणी एका वैद्यकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. नुकतेच पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली स्थानकात हेल्थ चेकअप एटीएम बसविण्यात आले आहे.