प्रवाशांना कळणार ‘बेस्ट’ची अचूक वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 02:35 AM2018-03-15T02:35:47+5:302018-03-15T02:35:47+5:30
बस फेऱ्यांमध्ये कपात आणि वाहतूककोंडीमुळे बस थांब्यावर तासन्तास तिष्ठत राहणा-या मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
मुंबई : बस फेऱ्यांमध्ये कपात आणि वाहतूककोंडीमुळे बस थांब्यावर तासन्तास तिष्ठत राहणा-या मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. बराच काळ केवळ चर्चेत असलेली बेस्ट बसची अचूक वेळ सांगणारी इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) यंत्रणा अंतर्भूत करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी ११२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलची अचूक वेळ सांगणाºया अॅपसारखी सेवा बेस्ट उपक्रमानेही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बºयाच काळापासून होत होती. बस थांब्यावर उभे राहिल्यानंतर बस नेमकी कधी येईल, याची शाश्वती नसल्याने प्रवासी कंटाळून खासगी टॅक्सी, रिक्षा अशा खासगी वाहतुकीकडे वळले आहेत. तरीही बेस्ट बसची अचूक वेळ सांगणारी यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव धूळखात पडला होता. गेल्या काही वर्षांमध्ये बेस्टचा प्रवासी वर्ग थेट २९ लाखांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या ‘बेस्ट’ने सेवा दर्जेदार करण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार आयटीएमएस प्रणाली सेवेत आणण्याचा प्रस्ताव नुकताच बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या नवीन प्रणालीमुळे मुंबईकर प्रवाशांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे.
अत्याधुनिक पद्धतीमुळे प्रवाशांना नेमकी बस कोणत्या वेळेत येईल, याची अचूक माहिती मिळणार आहे.
या पद्धतीत आगार, गाड्यांचा ताफा, कार्यशाळा आदींशी संबंधित गोष्टींचीही सांगड घालण्यात येणार आहे.
फेºयांचे नियोजन, वेळापत्रक, प्रवासी नोंदणी, वाय-फाय, सीसीटीव्ही, कर्मचाºयांची उपस्थिती, आगारातून बस बाहेर पडण्याची-येण्याची वेळ, वेग, ठिकाण आदींची माहिती असणार आहे.
बेस्ट व्यवस्थापनास नियोजनाच्या दृष्टीने त्याचा फायदा होणार आहे. एवढेच नव्हेतर, एखाद्या थांब्यावर प्रवाशांची जास्त गर्दी लक्षात घेऊन तिथे जादा फेºया चालविणेही सोपे ठरणार आहे.
ंपालिकेची मदत घेणार : या प्रणालीसाठी क्वेस कॉर्पोरेशन कंपनीस पाच वर्षांसाठी कंत्राट दिले जाणार आहे. सुरुवातीस कंपनीने या प्रणालीसाठी ११६ कोटी रुपये इतकी रक्कम ठरवली होती. पण बेस्टने कंपनीशी वाटाघाटी केल्यानंतर ही रक्कम कमी करण्यात आली आहे. मात्र आर्थिक संकटात असलेले बेस्ट उपक्रम ही रक्कम देण्यासाठी मुंबई महापालिकेचे सहकार्य घेणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितले.