प्रवास होणार सुखकर!

By admin | Published: November 22, 2014 01:09 AM2014-11-22T01:09:19+5:302014-11-22T01:09:19+5:30

पूर्व आणि पश्चिम उपनगरे थेट मेट्रोने जोडली जाणार असल्याने मुंबईकरांच्या वेळेची बचतही होणार आहे.

Traveling! | प्रवास होणार सुखकर!

प्रवास होणार सुखकर!

Next

सचिन लुंगसे, मुंबई
दहिसर-मानखुर्द आणि वडाळा-कासारवडवली या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसह वांद्रे-कुर्ला संकुलाजवळील चार फ्लायओव्हर आणि रस्त्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने आता सात वर्षांनी का होईना मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार असून, पूर्व आणि पश्चिम उपनगरे थेट मेट्रोने जोडली जाणार असल्याने मुंबईकरांच्या वेळेची बचतही होणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने चारकोप-वांद्रे-मानखुर्द हा मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्यात येत होता. मात्र तिवरांचे जंगल, सीआरझेडच्या नियमांमुळे चारकोप आणि मानखुर्द येथे कारडेपोच्या उभारणीस परवानगी देण्यास केंद्रीय पर्यावरण खात्याने नकार दर्शविला होता. परिणामी गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प कागदावरच होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील हा मेट्रोचा करार रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे संकेत दिले होते; राज्यात नवे सरकार आल्यानंतर हा प्रश्न निकाली लागला. या प्रकल्पातील अडचणी सुटत नसल्याच्या कारणास्तव अखेर हा प्रकल्प उभारण्याबाबतचा करार रद्द करीत असल्याचे रिलायन्सने जाहीर केले. तत्पूर्वी मुख्यमंत्रिपदी नव्याने विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काही कालावधीतच धोरणात्मक निर्णय घेत चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मेट्रो प्रकल्पाची लांबी दहिसरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आणि विरोधकांना चपराक लगावली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने कुलाबा-सीप्झ असा भुयारी मार्गदेखील उभारण्यात येणार आहे. या मेट्रोचा काही भाग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाखालून जात आहे. त्यामुळे प्रकल्पातील ७७७ कोटींचा खर्च मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून मिळणार आहे.

Web Title: Traveling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.