कुर्ला स्थानक ते बीकेसी प्रवास सुसाट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 02:57 AM2019-11-03T02:57:09+5:302019-11-03T02:57:18+5:30
शंभर वर्षे जुनी चाळ पाडून रस्त्याचे रुंदीकरण
मुंबई : बिझनेस हब बनलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलात दररोज ये-जा करणाऱ्या लोकांची वाहतूककोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. सीताराम भारूमार्गावरील शंभर वर्षे जुनी डेविड चाळ पाडून या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तब्बल १९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर या चाळीतील रहिवासी अन्यत्र स्थलांतरित होण्यास तयार झाले आहेत. त्यांचे जवळच्या परिसरात पुनर्वसन केल्यानंतर या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कुर्ला स्थानक ते बीकेसी या मार्गावरील वर्दळीच्या काळातील दीड तासाचा प्रवास नवीन वर्षात अवघ्या १५ मिनिटांत होणार आहे.
बीकेसीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापना सुरू झाली आहेत. कुर्ला स्थानकावरून या ठिकाणी लाखो नागरिक दररोज नोकरीधंद्यासाठी येत असतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने मुंबईकरांचे दररोज तास-दोन तास फुकट जातात. यामुळे येथील प्रवास सुसाट करण्यासाठी महापालिकेने सीताराम भारू मार्गावरील चाळ पाडून रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २००० मध्ये महापालिकेने येथील रहिवाशांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हा प्रकल्प पुढे सरकला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये येथे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे वाढल्याने रस्ता मोकळा करणे आता आवश्यक झाले आहे.
यासाठी महापालिकेने डेविड चाळीतील रहिवाशांची सहमती मिळवली असून त्यांचे पुनर्वसन नजीकच्या परिसरात करण्यात येणार आहे. या चाळीत ३७ कुटुंबे आणि १७ व्यावसायिक आस्थापना आहेत. कुर्ला स्थानकावरून बीकेसीला जाण्यासाठी वाहन चालकांना या चाळीला वळसा घालून एलबीएल मार्गावरून बीकेसीला पोहोचता येते. चाळ पाडल्यानंतर हा प्रवास १५ मिनिटांमध्ये होईल, असा विश्वास एल विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू यांनी व्यक्त केला. चाळीचे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यवर रस्ता रुंदीकरणाचे काम चार महिन्यांमध्ये होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
च्चाळ पाडल्यानंतर ३० फुटांचा रस्ता ५० फूट करण्यात येईल.
च्रस्ता रुंदीकरणानंतर बेस्ट उपक्रमालाही कुर्ला स्थानक ते बीकेसी बस सुरू करता येईल.
च्फेब्रुवारी महिन्यापर्यंत सीताराम भारू मार्ग वाहतुकीसाठी मोकळा होणे अपेक्षित आहे.