मुंबई : रोजची असलेली वाहतूककोंडी, रस्त्यावरील कामे यामुळे मुबईकरांचा प्रवासाचा वेग मंदावला असल्याचे समोर आले आहे. ट्रॅव्हल टाइम रिपोर्ट क्यू १ २०१९ आणि क्यू १ २०१८ हा अहवाल मूव्ह इन सिंक या संस्थेने नुकताच जाहीर केला आहे. या अहवालामध्ये बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे, मुंबई आणि दिल्ली या शहरांचा अभ्यास करण्यात आला. भारतीयांना आपल्या दिवसभराच्या वेळेतील ७ टक्के वेळ हा प्रवासासाठी लागतो, असेही स्पष्ट झाले आहे. जगातील इतर नागरिकांपेक्षा भारतीयांचा दररोज प्रवासात जास्त वेळ जातो.
प्रवासात दररोज दोन तास लागतात. कामाला जाण्यासाठी सोमवार हा सर्वात खराब दिवस असल्याचे या सहा शहरांतील सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये बुधवारी वाहतुकीचा वेग वाढतो तर बंगळुरूचा मंगळवारी, दिल्लीचा गुरुवारी आणि शुक्रवारी चेन्नई व हैदराबादचा वेग वाढतो. तर कामावरून घरी परतण्याच्या प्रवासासाठी सायंकाळी ६ वाजताची वेळ खराब असल्याचे दिल्ली, बंगळुरू आणि चेन्नईमध्ये आढळले. तर मुंबई-पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजताची वेळ खराब आहे, दिवसभरात सकाळी ९ वाजता खूप वाहतूक मंदावते असे अहवालामध्ये सांगण्यात आले आहे. तर सतर्कता आणि कंपनीच्या कामाच्या वेळेतील बदल यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा २० ते ४० किंवा २५ ते ५० मिनिटांचा वेळ वाचू शकतो, असे सुचविण्यात आले आहे.शहरातील दैनंदिन प्रवासाची सरासरी गतीप्रमुख शहरांतील गती (प्रति तास वेग)चेन्नई-२५.७ किमी, हैदराबाद-२१.२ किमी, दिल्ली २०. ६ किमी, पुणे - १९.९ किमी, बंगळुरू - १८.७ किमी, मुंबई - १८. ५ किमी