Join us  

गणरायाचा प्रवासही खडतर

By admin | Published: August 10, 2016 3:42 AM

मुसळधार पावसामुळे खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे टेन्शन वाढविले आहे़ विशेषत: पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गाची दुरवस्था असल्याने

मुंबई: मुसळधार पावसामुळे खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे टेन्शन वाढविले आहे़ विशेषत: पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गाची दुरवस्था असल्याने विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत़ २१ आॅगस्टपर्यंत सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची हमी पालिका प्रशासनाने दिली आहे़ मात्र दरवर्षी अशा डेडलाइनही खड्ड्यात जात असल्याने गणेशमूर्ती निर्विघ्न मंडपांपर्यंत नेण्याचे आव्हान मंडळांपुढे आहे़अनेक मंडळांनी गणेशमूर्ती मंडपात नेण्याची तयारी सुरू केली आहे़ २१ आॅगस्टपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात करतील़ मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर शेकडो खड्डे पडले आहेत़ पाऊस थांबत नसल्याने हे खड्डे भरण्याची संधी पालिकेला मिळत नाही़ यामुळे गणरायाचा प्रवासही यंदा खडतर आहे़ हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्याचे साकडे गणेशोत्सव मंडळांनी पालिका मुख्यालयात बैठकीत प्रशासनाला घातले़ महापौर स्नेहल आंबेकर यांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि पूर्व उपनगर समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते़ गणेशमूर्ती नेण्यास सुरुवात होण्यापूर्वी सर्व खड्डे भरले जातील, असे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी या वेळी दिले़ (प्रतिनिधी) असा करणार खड्ड्यांचा सामनापालिकेने आश्वासन दिले असले तरी खड्डे डेडलाइनप्रमाणे बुजविले जातील, याची शाश्वती मंडळांनाही नाही़ त्यामुळे गणेशमूर्ती खड्ड्यांतून आणताना मंडळांनीही पूर्वतयारी सुरू केली आहे़ त्यानुसार खड्ड्यात गोणी टाकून त्यावर स्टील प्लेट्स चढवून गणेशमूर्ती असलेले वाहन पुढे सरकविण्यात येईल, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव गिरीश वालावलकर यांनी दिली़ पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरून सर्वाधिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती नेण्यात येतात़ मात्र महामार्ग खड्ड्यात असल्याने गणेश मंडळं धास्तावली आहेत़ त्यामुळे हे खड्डे भरण्याची विनंती मंडळांनी पालिकेला केली़ ही मागणी मान्य करीत मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खाते या प्राधिकरणांनी आपल्या रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास ठेकेदारांकडून ते काम करून घेऊन त्याचे बिल संबंधित प्राधिकरणाला धाडण्यात येणार आहे़उपनगरांकडे दुर्लक्षगेल्या काही वर्षांमध्ये उपनगरातील गणेशोत्सव मंडळं पवई तलावावर विसर्जनासाठी गर्दी करू लागले आहेत़ मात्र गिरगाव चौपाटीवर अति महत्त्वाच्या व्यक्ती येत असल्याने अनंत चतुर्दशीला येथे जय्यत तयारी केली जाते़ त्याचवेळी उपनगर मात्र दुर्लक्षितच आहे़ पवई तलावावर सुमारे चार हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. मात्र या ठिकाणी कोणतीच व्यवस्था नसल्याने वाहतूककोंडी होतेच़ याउलट तलावात मगरी असल्याने गणेशमूर्तींचे विसर्जन करताना दुर्घटनेचीही भीती वाढली आहे़ त्यामुळे पवई तलावाच्या ठिकाणीही विसर्जनासाठी आवश्यक तयारी करण्याची मागणी अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत यांनी या बैठकीत केली़मुसळधार पावसात नवीन प्रयोगही गेले वाहूऩ़़मुंबई : नागपूरस्थित कंपनीने खड्डे भरण्याच्या मोहिमेतून आधी माघार घेतल्यामुळे तोंडघशी पडलेल्या महापालिकेने तीन नव्या कंपन्यांना संधी दिली़ मात्र यापैकी दोन कंपन्या या परीक्षेत फेल ठरल्या आहेत़ त्यामुळे खड्डे भरून घेण्याचे आव्हान पालिकेपुढे उभे राहिले असून, उरलेल्या एका कंपनीवरच प्रशासनाची आता मदार आहे़खड्ड्यात भरलेले मिश्रण चार महिने उखडणार नाही, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या नागपूरस्थित कंपनीने ऐनवेळी माघार घेतली़ त्यामुळे या कंपनीच्या भरवशावर दोन आठवड्यांत खड्डेमुक्त मुंबईचे लक्ष्य ठेवणाऱ्या पालिकेचे गणित बिघडले़ परिणामी, खड्डे भरण्याचा प्रयोग करण्यास तयार असलेल्या तीन नवीन कंपन्यांना संधी देण्याची वेळ पालिकेवर आली़त्यानुसार एआर थर्मो, शालिमार आणि इको ग्रीन या तीन कंपन्यांनी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काही खड्डे भरण्याचा प्रयोग केला़ परंतु यापैकी शालिमारने भरलेले खड्डे काही दिवसांत पावसात वाहून गेले़ इको ग्रीनचीही अशीच अवस्था होती़ एआर थर्मोचा निकाल मात्र अद्याप चांगला दिसून येत असल्याचे, पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)