मुंबई : वाड्यातील पाच आदिवासी शाळांमध्ये उपक्रम राबवण्यासाठी आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या न्यूझीलंडमधील दोघांनी व एका भारतीयाने मुंबई ते नाशिक असा पायी प्रवास करण्याचा निर्णय केला आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे ३ डिसेंबरला सकाळी या मोहिमेला हिरवा कंदील दाखवून मोहिमेची सुरुवात करतील.मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पायी प्रवास करणाºया पंकज आंबवणे यांनी ही माहिती दिली. पंकज यांच्यासोबत न्यूझीलंडमधील माइक बटलर आणि डेरिल पर्सी हे दोन नागरिकही या मोहिमेत सामील होणार आहेत. याबाबत पंकज यांनी सांगितले की, वाडा तालुक्यातील पाच आदिवासी शाळांना मदत करण्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी ३ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक आणि वाडा असा ५७० किलोमीटरचा पायी प्रवास केला जाणार आहे. न्यूझीलंडमध्ये अशाच प्रकारे राबवलेल्या मोहिमेतून सामाजिक कार्य केले होते. आता भारतातही अशाच प्रकारे आदिवासी शाळांना मदत करण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत हातात बकेट घेऊन तिघेही पादचारी प्रवास करणार आहेत. याशिवाय आॅनलाइन साइटद्वारेही मदतीचे आवाहन केले जात आहे. भारतासहित न्यूझीलंडमध्येही एक साइट तयार केली असून एकूण १२ लाख रुपये जमा करण्याचा हेतू आहे.या मोहिमेतून जमा होणाºया निधीतून तीन आदिवासी शाळांत विज्ञान प्रयोगशाळा, एका शाळेस संगीत वाद्ये आणि एका शाळेस खेळाचे साहित्य देण्यात येणार आहे. संपूर्ण प्रवासात राहण्याची आणि जेवणाची सोय काही मदतनिसांनी केल्याने तो खर्च वाचल्याचेही आंबवणे यांनी सांगितले.
आदिवासी शाळांसाठी ‘ते’ करणार पायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 2:59 AM