Join us

उपनगरांतील प्रवास होणार ठंडा ठंडा...कुल कुल...; बेस्टच्या एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:38 AM

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी उपक्रमाच्या ताफ्यात २१ फेब्रुवारीपासून वातावरण पूरक एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उपनगरांत राहणाऱ्या प्रवाशांची निकड लक्षात घेत बेस्ट उपक्रमातर्फे एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसगाड्या उपनगरांतही चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टच्या १० एसी इलेक्ट्रिक दुमजली बसगाड्या लवकरच कुर्ला, बी.के.सो. या भागात सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे फक्त दक्षिण मुंबईतच नाही तर उपनगरात ही मुंबईकरांचा प्रवास ठंडा ठंडा...कुल कुल..होणार आहे. 

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी उपक्रमाच्या ताफ्यात २१ फेब्रुवारीपासून वातावरण पूरक एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये सध्या एकूण ३९ इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या दाखल झाल्या असून त्यापैकी २० बसगाड्या दक्षिण मुंबईत सुरू करण्यात येत आहेत. व १० बसगाड्या मुंबई उपनगरांमध्ये सुरू करण्यात येणार असून उर्वरित ९ गाड्या टप्प्याटप्याने मुंबई उपनगरांमध्ये सुरू करणात येणार असल्याची माहिती बेस्टच्या उपक्रमाकडून देण्यात आली. 

या बसगाड्यांमधून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायूप्रदूषण होत नाहीत या बसमध्ये दोन्ही बाजूने स्वयंचलित प्रवेशद्वारे असल्याने प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होत आहे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्ही आणि मोबाइल चार्जिंगची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. या नव्या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे. 

उपक्रमाकडून मुंबईकरांसाठी बस पुरवठादार स्वीच मोबिलीटी या संस्थेला एकूण २०० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापैकी ३९ बसगाड्या या आधीच प्राप्त झाल्या असून उर्वरित बसगाड्या मार्च २०२४ अखेरपर्यंत प्राप्त होणार आहेत. 

या २०० वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्यांची सेवा मुंबईतील १२ बस आगारांतून सुरू करण्यात येणार आहेत.  बेस्ट उपक्रमातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवांचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे उपक्रमाकडून करण्यात आले आहे.

 इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे भाडे ५ किमीपर्यंत ६ रुपये इतके आहे. ताफ्यात सामिल झालेल्या नव्या ई-बसेसमुळे प्रवाशांना बस स्टँडवर अधिक वाट पाहावी लागणार नाही. तसेच यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. वर्षाच्या अखेरपर्यंत नव्या इलेक्ट्रिक बस बेस्टच्या ताफ्यात सामील होणार आहेत.

टॅग्स :बेस्ट