लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या उबर ड्रायव्हरच्या बेमुर्वतखोर वर्तनाचे वृत्त 'लोकमत'ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर अनेक वाचकांनी लोकमतच्या कार्यालयात दूरध्वनी करून आपल्या व्यथा मांडल्या. मुळात बहुतांशवेळा काळी-पिवळी टॅक्सीचे ड्रायव्हर प्रवासासाठी नकार देत असल्यामुळे अनेकांना ओला-उबरचा पर्याय स्वीकारावा लागतो. मात्र, या टॅक्सीकरिता पैसे जास्त मोजावे लागतातच, पण बऱ्याचवेळा सोबत मनस्तापही भोगावा लागतो, अशाच प्रतिक्रिया बहुतेकांनी यावेळी व्यक्त केल्या.
सतीश (बदललेले नाव) यांनी सांगितले की, काहीवेळा ड्रायव्हर बुकिंग उचलतात. प्रवासी बसल्यावर आपल्याला तिथे जायचे नाही, असे सांगतात. प्रवाशाने कुठले बुकिंग केले आहे आणि त्याकरिता किती पैसे मिळणार आहेत, याची माहिती ड्रायव्हरला आधीच मिळते. यापूर्वी ही व्यवस्था नव्हती. मात्र, ही व्यवस्था उपलब्ध असूनही ड्रायव्हर बुकिंग स्वीकारतात आणि ऐनवेळी नकार देतात. मुळात अशा स्थितीत ड्रायव्हरने बुकिंग रद्द करणे अपेक्षित असते. मात्र, त्यावेळी देखील ते मुजोरी करतात. कारण त्यांनी स्वतः बुकिंग रद्द केले तर त्यांचे पैसे कापले जातात आणि प्रवाशाने रद्द केले, तर त्याचे पैसे कापले जातात. प्रवासी घाईत असल्यामुळे वादावादीपेक्षा बुकिंग रद्द करून टाकतात, असा अनुभवही समोर आला. गाड्यांची सेवा वातानुकूलित असूनही ड्रायव्हर एसी लावण्यास देखील मनाई करतात.
प्रवासी सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
सीमा (बदललेले नाव) यांनी सांगितले की, मला चार वेळा असा अनुभव आला की, ड्रायव्हर लोक इंधन भरायचे आहे. त्यामुळे रोखीने पैसे देण्याचा आग्रह करतात किंवा सरळ मी अॅप बंद करतो, मला तेवढेच पैसे रोखीने द्या, असे सांगतात. प्रवास सुरु झाल्यानंतर जर ड्रायव्हरने असे सांगितले तर अशावेळी प्रवासी सुरक्षेची जबाबदारी कुणाची, असा सवाल देखील उपस्थित केला. या समस्यांची दखल घेऊन या समस्यांची दखल घेऊन ध्ये कठोरता आणली पाहिजे तसेच ड्रायव्हरना त्याबाबत प्रशिक्षित केले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.
...काही जण ऐकत नाहीत
समीर (बदललेले नाव) यांनी सांगितले की, गाडी चालवताना फोन बंद करण्यास सांगितल्यास काही ड्रायव्हर ऐकतात, पण काही ऐकत नाहीत. बुकिंग केल्यानंतरही गाडी जागेवरून हलताना दिसत नाही. ड्रायव्हर बुकिंग उचलतात आणि प्रवासी बसल्यावर आपल्याला तिथे जायचे नाही, असे सांगतात.