मुंबई : सार्वजनिक रुग्णालयात रुग्ण दाखल होण्यापूर्वी त्याचा प्रवास इतिहास तपासा, तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश किंवा केरळसारख्या राज्यातील रुग्ण असल्यास त्याची कोविड चाचणी करण्याचा निर्णय सार्वजनिक रुग्णालयांनी घेतला आहे. अन्य राज्यांमध्ये कोविड रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांनी हा निर्णय घेतला आहे.
केईएम रुग्णालयाच्या डॉ. संगीता रावत यांनी सांगितले, सध्या रुग्णांचा प्रवास इतिहास घेतला जात आहे. लक्षणे आढळून आल्यास संशय दूर करण्यासाठी त्याची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या ९० च्या सरासरीत आहे. मात्र, अन्य राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रुग्णालयांमध्ये राज्याबाहेरून येणारे रुग्ण निरीक्षणाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे.
सध्या मे महिन्याची उन्हाळी सुटी सुरू असून, इतर राज्यातील नागरिक मुंबईत दाखल होत असतात. त्याचसोबत इतर राज्यातील रुग्णदेखील मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयात दाखल होत असतात. अशा मुंबईबाहेरून आणि रुग्णवाढ असलेल्या राज्यातील प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणीचे निर्देश देण्यात आले आहेत.
धारावीमध्ये पुन्हा कोरोना, महापालिका सतर्ककोरोनावर मात केलेल्या धारावीत बुधवारी पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. १७ मार्च रोजी कोरोनाच्या रुग्णाची धारावीत नोंद झाली होता. आता पुन्हा धारावीत नोंदविण्यात आलेल्या रुग्णामुळे महापालिका सतर्क झाली आहे. तर माहीम आणि दादरमध्ये शून्य कोरोना रुग्णाची नोंद झाली असून, धारावी, दादर आणि माहीममधील सक्रिय रुग्णांचा एकूण आकडा ६ आहे.