Join us

श्रमिकांवर संयमाने कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:05 AM

पोलीस आयुक्तांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्याच्या आणि आताच्या परिस्थितीत फरक आहे. पूर्वी लोकांची मानसिक ...

पोलीस आयुक्तांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्याच्या आणि आताच्या परिस्थितीत फरक आहे. पूर्वी लोकांची मानसिक तयारी होती, आता तशी तयार नाही. सर्वात जास्त हातावर पोट असणारा श्रमिक भरडला जात आहे. त्यामुळे कुणावरही चौकशीशिवाय कारवाई करू नका. तसेच श्रमिकांंवर संयमाने कारवाई करा, अशा सूचना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.

बुधवारी रात्रीपासून लागू होणाऱ्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर नगराळे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गरजू श्रमिकांना मदत करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले. श्रमिक बाहेर दिसताच त्याच्यावर कारवाई करू नका. तो कुटुंबासाठी अन्नाच्या, औषधाच्या शोधात बाहेर पडू शकतो. अशा वेळी आधी चौकशी करा. विनाकारण कारवाई करू नका. तसेच कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कुणावरही कारवाई करू नका असेही त्यांनी नमूद केले. यापूर्वी पोलीस दलाने चांगले काम केले. यावेळीही असाच लढा द्यायचा आहे. पोलिसांची प्रतिमा मलीन होईल असे कुठलेही कृत्य करू नका, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच या अंमलबजावणीमुळे पोलिसांवरचा ताण वाढणार आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन जबाबदारी हाताळा, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या हद्दीतील रहिवाशांचे विशेषत: प्रतिबंधित इमारतींमध्ये वास्तव्य करणाऱ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यांना मदत करा. प्रत्येकाने हॉस्पिटल, बेड संबंधित हेल्पलाइन क्रमांक सोबत ठेवा, जेणेकरून नागरिकांपर्यंत तत्काळ मदत पोहोचविणे शक्य होईल. अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

* रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवा

रेमडेसिविर औषधांचा काळाबाजार थांबविणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले सोर्सेस कामाला लावून काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा आणि जप्त केलेला औषधसाठा गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवा, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

..........................