मुलींना वस्तू समजून वागणूक देणे वेदनादायी; कोर्टाने सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 08:12 AM2023-02-16T08:12:56+5:302023-02-16T08:13:15+5:30
उच्च न्यायालय : महिलेची जामिनावर सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘आपण एकविसाव्या शतकात आहोत, तरीही मुलींना वस्तू म्हणून वागणूक देण्याच्या घटना घडत आहेत. आर्थिक फायद्याचे माध्यम म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते. एका वर्षाच्या मुलीला तिच्या आईने विकणे, हे नैतिकता आणि मानवी हक्कांच्या तत्त्वांनुसार अत्यंत आक्षेपार्ह आहे,’ असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एक वर्षाच्या मुलीला विकत घेतलेल्या महिलेची जामिनावर सुटका केली.
नवरा कारागृहात असल्याने उदरनिर्वाहासाठी एका मातेने पोटच्या मुलीला महिलेस विकले. मुलीला विकल्यानंतर संबंधित महिलेने अर्जदार महिलेचे कर्ज चुकते केले आणि परत मुलीचा ताबा मागितला. मात्र, अर्जदार महिला आणि तिच्या पतीने मुलीला परत करण्यास नकार दिला. त्यामुळे मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दाम्पत्यावर भारतीय दंडसंहिता व बाल हक्क कायद्यातील काही कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. याप्रकरणी जामीन मिळावा, यासाठी दाम्पत्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना न्या. एस. एम. मोडक यांच्या एकलपीठाने वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले. संबंधित महिलेचा पती कारागृहात असल्याने तिला पैशांची गरज होती, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली.‘अर्जदाराला दोन अल्पवयीन मुले आहेत. खटला कधी संपेल, हे माहीत नाही. त्यामुळे खटल्याचा निकाल लागेपर्यंत अर्जदाराला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही. तिच्या दोन लहान मुलांच्या कल्याणाचाही विचार करावा लागेल,’ असे स्पष्ट करत न्यायालयाने महिलेला जामीन मंजूर केला.