Join us

Eknath Shinde: "माणसाशी माणूसकीने वागणारा", धर्मवीरच्या निर्मात्याला आठवली पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 2:24 PM

वागळे इस्टेटमध्ये एका कार्यक्रमाला 2007 साली पहिल्यांदा तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी, तुम्ही आमदार होतात

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राजभवनवर शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदाचे एकमात्र दावेदार मानलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री झाले.  सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. राजकीय नेते, अभिनेते आणि कार्यकर्त्यांपासून दिग्गजांपर्यंत अनेकजण एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देण्यात येत आहेत. दिग्दर्शक आणि धर्मवीर चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका निभावणारा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) यानेही मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनीही आपल्या आठवणी जागवत नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

वागळे इस्टेटमध्ये एका कार्यक्रमाला 2007 साली पहिल्यांदा तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी, तुम्ही आमदार होतात. तसा तुम्हाला बघून घाबरलो होतो. पण तुम्ही खूप छान बोललात, सचिन जोशीला मला तुमचं व्हिसीटींग कार्ड द्यायला लावलत आणि "काहीही मदत लागली तर सांगा" असं आवर्जून म्हणालात. माझ्यासारख्या सामान्य कलाकाराला मदत लागणारच. तीही तुम्ही एका मिनटात केलीत. विशेष म्हणजे त्या मदतीचे आभार म्हणून मी तुम्हाला तुमचंच एक भित्तीचित्र भेट म्हणून द्यायला आलो होतो, तेव्हाचे तुमचे शब्द मला आठवतात "हे कशाला? आपण मित्र आहोत मंगेश", असा प्रसंग मंगेश देसाई यांनी फेसबुकवरुन लिहिला आहे. 

सगळे तुम्हाला नमस्कार करायचे म्हणून मी पण एकदा केला. तेव्हा हे करत जाऊ नका, आपण मित्र आहोत असंच तुम्ही म्हणाला, आणि खरंच मित्र झालात. त्यानंतर, जसजसे वर्ष सरत गेले, तसतसे मोठ्या भावासारखे आपण प्रत्येक प्रसंगात पाठिशी उभे राहिलात. माझी 2013 पासून मनात असलेली "दिघे" साहेबांवरच्या चरित्रपटाची मनोकामना पूर्ण करून माझी निर्माता म्हणून ओळख घडवलीत. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळ केलंत, त्या बद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आज तुम्ही महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री झालात. प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा, माणसाशी माणूसकीने वागणारा, विरोधकांना नमवणारा आणि क्षमा करणारा, अहोरात्र काम करणारा मी जवळून बघितलेला एक समाजकारणी मुख्यमंत्री झाला, याचा खूप अभिमान वाटतो, अशा शब्दात निर्माते मंगेश देसाई यांनी एकनाथ शिंदेंच्या स्वभावाचं वर्णन केलंय.

प्रसाद ओकनेही दिल्या धर्मवीर स्टाईल शुभेच्छा

प्रसाद यानं धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे (Dharamveer Mukkam Post Thane) या सिनेमात धर्मवीर आनंद दिघे (Dharamveer Anand Dighe) यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. प्रसाद आणि एकनाथ शिंदे यांच्यात फार चांगले संबंध आहेत. प्रसाद ओकनं धर्मवीर सिनेमातील एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत धर्मवीर सिनेमात आनंद दिघे यांच्या भूमिकेतील प्रसाद ओकने एकनाथ शिंदे यांच्या खाद्यांवर हात ठेवला आहे. हा फोटो धर्मवीरच्या ट्रेलर लाँच वेळीचा असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तर दुसरा फोटो  हा धर्मवीर सिनेमातील आहे. एकनाथ शिंदे देवाच्या पाया पडत असताना आनंद दिघे त्यांना पाहत आहेत.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईशिवसेनाठाणे