Join us

नायरमध्ये रोज २० हृदयरुग्णांवर उपचार

By admin | Published: July 09, 2016 3:36 AM

मुंबई सेंट्रल येथील यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मदाय रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व संगणकीय

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मदाय रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व संगणकीय सुविधेने सुसज्ज अशी कार्डियाक कॅथलॅब व हृदयरोग अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले आहेत. कार्डियाक कॅथलॅबमधून दररोज सरासरी २० हृदयरुग्णांची तपासणी व उपचार शक्य आहे. पूर्वीच्या कॅथलॅबच्या तुलनेत ही क्षमता दुप्पट झाली आहे. नवीन कॅथलॅबमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. यामध्ये अ‍ॅन्जिओप्लास्टी, स्टेन्टिंग, व्हॉल्वोटॉमीज आणि पेसमेकर बसविणे यांचाही समावेश आहे.नायर रुग्णालय आणि टोपीवाला महाविद्यालयातील कार्डियाक कॅथलॅब व हृदयरोग अतिदक्षता विभागाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाले. हे विभाग आता मुंबईकरांच्या आरोग्य सेवेसाठी सज्ज झाले आहेत. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन कार्डियाक कॅथलॅब संपूर्णत: संगणकीय कार्यप्रणालीद्वारे कार्यरत आहे. हृदयरोगाची तपासणी करताना हृदयामध्ये सोडण्यात येणाऱ्या विशिष्ट औषधाची मात्रा पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात सोडूनही या संगणकीय प्रणालीमध्ये अत्यंत सुस्पष्टपणे उमटते. ६० इंच आकाराची आणि ८ मेगा पिक्सल क्षमतेची आधुनिक प्रतिमा पटल (डिसप्ले स्क्रीन) असलेल्या या लॅबमध्ये हृदयरोग निदान अधिक अचूक आणि लवकर करणे आता शक्य होणार आहे. १८४ मायक्रोमीटर इतक्या सुक्ष्म क्षमतेच्या प्रतिमा टिपणाऱ्या फ्लॅट पॅनल तंत्रज्ञानामुळे हृदयाची अत्यंत सुस्पष्ट प्रतिमा मिळणार आहे. नवजात बाळांवर हृदयरोग उपचार करण्याची सुविधादेखील या ठिकाणी उपलब्ध आहे, तसेच ‘द रोटाब्लेटर’ तंत्राचा उपयोग करून हृदयातील वाहिन्यांमध्ये साचलेला थर काढण्याची सुविधाही रुग्णांसाठी उपलब्ध झाली आहे. १०० किलोवॅटचे विद्युत जनित्र या कॅथलॅबकरिता कार्यान्वित राहणार असल्याने अखंड सुविधा देणे शक्य होणार आहे. नायर रुग्णालयाच्या हृदयरोग विभागामध्ये दररोज सरासरी १५० रुग्ण हृदयरोग बाह्यरुग्ण विभागात तपासले जातात. दररोज सरासरी ३ रुग्ण हृदयविकाराचा झटका आलेले तर ३ ते ४ रुग्ण हृदयक्रिया बंद पडण्याच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात दाखल होतात. हृदयरोग अतिदक्षता विभागाची ८ खाटांची क्षमता वाढवून आता १६ इतकी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सर्वसाधारण २५ खाटा उपलब्ध आहेत. त्यामध्ये १५ पुरुषांकरिता व १० महिलांकरिता आहेत. १ कॅथलॅबच्या साहाय्याने दररोज इतक्या विविध प्रकारच्या हृदयरुग्णांची तपासणी, तातडीचे उपचार, औषधोपचार, शस्त्रक्रिया हा सर्व भार नायर रुग्णालय सांभाळते. हृदयविकाराची संवेदनशीलता आणि वाढती संख्या लक्षात घेत सुविधांमध्ये वाढ केली आहे. (प्रतिनिधी)लोकार्पण सोहळ्याला यांची उपस्थितीउपमहापौर अलका केरकर, खासदार अरविंद सावंत, आमदार वारिस युसूफ पठाण, आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, आयुक्त अजय मेहता, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम, बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा यामिनी जाधव, स्थापत्य समिती (शहर)चे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन, नगरसेवक अरविंद दूधवडकर, संजय आंबोले आदींची या सोहळ्याला उपस्थिती होती. मुंबईकरांनो, आरोग्याकडेही लक्ष द्या- मुंबईकरांना घड्याळाच्या काट्यावर धावपळ करत दैनंदिन जीवन जगावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मुंबईकरांच्या आरोग्य सेवेसाठी प्रथमोपचारापासून सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा मुंबई महापालिका उपलब्ध करून देत आहे. तथापि, मुंबईकरांनी स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, अशी भावना व्यक्त करतानाच सर्व मुंबईकरांना निरोगी आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली. नायर रुग्णालयाच्या हृदयरोग विभागामध्ये वर्षाला सरासरी ३ हजार अ‍ॅन्जिओग्राफी होतात, तर ६०० ते ८०० अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात येतात. हृदयाच्या संकुचित झडपा उघडण्याच्या ५० ते ८० शस्त्रक्रिया, छिद्रे बंद करण्याच्या २५ ते ३० शस्त्रक्रिया, पेसमेकर बसविण्याच्या सुमारे ७० शस्त्रक्रिया या विभागात केल्या जातात. जनतेवर आरोग्य खर्चाचा बोजा टाकणार नाहीमहापालिका मुंबईकरांनाच नव्हे, तर इतर ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा पुरविते. फक्त रुग्णालयेच नव्हे, तर वैद्यकीय महाविद्यालये, परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सुपर स्पेशालिटी उपचारांची सुविधा असे वैविध्य या आरोग्य सेवेत आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा-सुविधांच्या तरतुदीत वाढ करू. मात्र, जनतेवर आरोग्य खर्चाचा बोजा टाकणार नाही. मुंबईकरांच्या आरोग्य सेवेसाठी महापालिका सदैव तत्पर आहे. या सुविधांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल. नायर रुग्णालयातील नवीन सुसज्ज हृदयरोग अतिदक्षता विभाग आणि कॅथलॅबमुळे हृदयरुग्णांना जास्त व अत्याधुनिक सुविधा देणे आता शक्य होणार आहे.- स्नेहल आंबेकर, महापौरमहापालिका दक्ष अर्थसंकल्पातील आरोग्य सेवा-सुविधा तरतुदीचा आकडा हा चलनमूल्य म्हणून जितका मोठा आहे, त्याहीपेक्षा मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिका अतिशय दक्ष आहे, याचा तो निदर्शक आहे. नायर रुग्णालयातील नवीन सुसज्ज कॅथलॅब ही आणखी तत्परतेने सेवा देणार असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे. - अलका केरकर, उपमहापौरदरवर्षी १ कोटी ४४ लाख रुग्णांची तपासणीसुमारे ३३०० कोटी रुपयांची तरतूद आरोग्य सेवा-सुविधांसाठी अर्थसंकल्पात महापालिका करत असते. आरोग्य सेवेवरील एकूण खर्चाच्या तुलनेत फक्त ६ टक्के उत्पन्न शुल्काच्या रूपात मिळते. दरवर्षी १ कोटी ४४ लाख रुग्णांची तपासणी महापालिका रुग्णालयांत केली जाते. एकूण १२ हजार खाटांची क्षमता असलेल्या महापालिका आरोग्य प्रशासनाची व्याप्ती प्राथमिक, माध्यमिक आरोग्य सेवा, सुपर स्पेशालिटी, वैद्यकीय महाविद्यालये, आरोग्य प्रशिक्षण कें द्रे अशी आहे. मुंबई महानगरातील सुमारे ६० टक्के लोकसंख्येला १ किलोमीटर परिघात, तर ९३ टक्के लोकसंख्येला २ किलोमीटर परिघात महापालिकेची आरोग्य सेवा मिळते.- अजय मेहता, आयुक्त