Join us

म्युकरमायकोसिसवरील उपचार खर्च दहा लाखांच्या घरात;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसनेही डोके वर काढल्याने देशभरात चिंता वाढू लागली आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसनेही डोके वर काढल्याने देशभरात चिंता वाढू लागली आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च जवळपास दहा लाखांच्या घरात असल्याने पैशांची जमवाजमव करताना रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला येत आहेत.

हा अवाढव्य खर्च सर्वसामान्य रुग्णांना परवडणारा नसल्याने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला; परंतु राज्यातील केवळ १०३ रुग्णालयेच त्याच्याशी संलग्न केल्याने अनेक रुग्ण या योजनेपासून वंचित राहत आहेत. खासगी रुग्णालयांत म्युकरमायकोसिसवर उपचार घ्यायचा झाल्यास किमान १० लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे पैशांची जमवाजमव करताना रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीला येत आहेत. अनेकांनी कर्ज काढून, घर-दागिने-जमिनी गहाण ठेवून पैसे भरल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

........

औषधांचा तुटवडा, दर आवाक्याबाहेर

- म्युकरमायकोसिसवर एम्फोटेरिसिन इंजेक्शन परिणामकारक ठरत आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णाला दिवसाला पाच ते सहा एम्फोटेरिसिन इंजेक्शन द्यावे लागतात. एका कुपीची किंमत पाच हजारांहून अधिक आहे.

- समजा एखाद्या रुग्णावर १० दिवस उपचार सुरू राहिल्यास केवळ इंजेक्शनचा खर्च ३ लाखांहून अधिक होतो. अन्य औषधे आणि उपचाराचा खर्च मिळून ८ ते दहा लाखांचे बिल रुग्णांच्या हातावर टेकवले जाते.

- देशभरात एम्फोटेरिसिनचा तुटवडा जाणवू लागल्याने दर आवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे या औषधांचे उत्पादन मुबलक प्रमाणात होत नसल्याने भविष्यात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

..........

रुग्णांचे नातेवाईक सांगतात...

अब्बू कोरोनातून बरे झाले; पण या नव्या आजाराने गाठले. सात दिवस झाले पाच लाखांहून अधिक रक्कम मोजली आहे. आणखी पाच दिवस उपचार चालतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पैसे कुठून आणायचे, हा प्रश्न आहे. नातेवाइकांकडून जमवाजमव सुरू आहे.

- अल्ताफ कुरेशी, रुग्णाचे नातेवाईक

.......

कोरोनामुळे नोकरी गेल्याने हलाखीचे जीवन जगत आहोत. त्यात आईला म्युकरमायकोसिसचे निदान झाले. माझी स्थिती पाहून पैसे द्यायला कोणी तयार नाही. आता घर गहाण ठेवून बँकेतून कर्ज काढणार आहे.

- राजन साळवी, रुग्णाचे नातेवाईक

...............

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाख असली तरी म्युकरमायकोसिसच्या बाबतीत त्यात थोडे बदल केले आहेत. या आजारातील रुग्णांना जेवढा खर्च लागेल तो या योजनेअंतर्गत दिला जाईल. त्यासाठी कमाल मर्यादाही ठेवलेली नाही. सध्या १३० रुग्णालयांची निवड केली असून, त्यात राज्यातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.

- डॉ. नागेश सोनकांबळे, विशेष कार्य अधिकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजना.

............

राज्यातील म्युकरमायकोसिस रुग्ण - २०००

म्युकरमायकोसिसमुळे झालेले मृत्यू - ९०