Join us

ग्रामीण भागांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:10 AM

मुंबई : ग्रामीण भागांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या १९ मुलांवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. यामध्ये ...

मुंबई : ग्रामीण भागांतील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या १९ मुलांवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. यामध्ये ३ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे. या मुलांना हृदयामध्ये छिद्र आणि ब्ल्यू बेबी सिंड्रोम असे हृदयविषयक विकार आढळले आहेत.

फोर्टिस हॉस्पिटलच्या पेडिएट्रिक कार्डियोलॉजीच्या सल्लागार डॉ. स्वाती गरेकर आणि पेडिएट्रिक कार्डियो-व्हॅस्कुलर सर्जरीचे सल्लागार डॉ. भरत सोनी यांच्या नेतृत्वात नाशिकच्या स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहयोगाने महिला व बाल रुग्णालय येथे स्क्रिनिंग ओपीडीचे आयोजन करण्यात आले. या ओपीडीमध्ये जवळपास ८७ मुलांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी २६ मुलांना त्वरित शस्त्रक्रिया उपचाराची गरज असल्याचे निदर्शनास आले. या मुलांपैकी १९ मुले व त्यांचे पालक गुरुवारी आले आहेत.

पेडिएट्रिक कार्डियोथोरासिस सर्जरीचे सल्लागार डॉ. धनंजय मालणकर म्हणाले की, आरोग्यसेवाच खर्चाच्या समस्येमुळे बहुतांश पालकांना त्यांच्या मुलांवर चांगले उपचार करता येत नाहीत. नाशिक आरोग्य प्राधिकरणांसोबतचा आमचा उपक्रम या कुटुंबांना साह्य करण्यासाठी आणि या मुलांना सुधारित जीवनाचा दर्जा देण्यासाठी आमच्याकरिता विश्वसनीय संधी देणारा ठरला. काही मुले खूपच आजारी आहेत आणि ओपन-हार्ट सर्जरी त्यांच्यासाठी जीवनदायी ठरेल.

पेडिएट्रिक कार्डियोलॉजीच्या सल्लागार डॉ. स्वाती गरेकर म्हणाल्या की, सहा मुलांवर साधे छिद्र शस्त्रक्रिया किंवा अतिरिक्त रक्तवाहिन्या बंद करण्यासाठी कॅथलॅबमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही मुले अल्प–उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधील असल्यामुळे त्यांच्या पालकांसाठी उपचार खर्च करणे खूपच कठीण आहे. तसेच महामारीमुळे या कुटुंबांवर अधिक आर्थिक ताण निर्माण झाला आणि निदान व उपचारामध्ये विलंब झाल्यामुळे त्यांच्या मुलांचे आरोग्य अधिक खालावले. या मुलांसाठी उपक्रम फायदेशीर ठरेल.

फोर्टिस हॉस्पिटल्सच्या विभागीय संचालिका डॉ. एस. नारायणी म्हणाल्या की, आम्हाला हा ओपीडी उपक्रम सुरू करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नाशिकच्या आरोग्य प्राधिकरणाच्या सहयोगाने केला जात आहे. हा उपक्रम ग्रामीण महाराष्ट्राच्या विविध भागांमधील मुलांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.