शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:55 AM2024-09-27T06:55:55+5:302024-09-27T06:56:11+5:30
हृदयविकाराच्या काही उपचारांकरिता रुग्णांना इतर रुग्णालयात जावे लागणार नाही
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील आठ शासकीय रुग्णालयांमध्ये आता हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. याकरिता रुग्णालयांच्या हृदयविकार विभागात कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजी (ईपी) लॅब तयार करण्यात येणार आहे. यामुळे हृदयविकाराच्या काही उपचारांकरिता रुग्णांना इतर रुग्णालयात जावे लागणार नाही. वैद्यकीय शिक्षण विभागाने ३९ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे.
ईपी लॅबच्या साहाय्याने जे उपचार केले जातात त्यासाठी खासगी रुग्णालयांत ३ ते ५ लाखाचा खर्च येतो. मात्र शासकीय रुग्णालयांमध्ये हे उपचार मोफत केले जाणार आहेत. मुंबईतील जे.जे. रुग्णालयाचाही यात समावेश आहे. ‘ईपी’ लॅबसाठी प्रत्येक रुग्णालयाला ४ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नागरिकांना हृदयविकार झाल्यानंतर विविध प्रकारच्या उपचारांना सामोरे जावे लागते. अँजिओप्लस्टी आणि बायपास या उपचारांपलीकडेसुद्धा आधुनिक उपचार केले जातात. अचानक चक्कर येऊन पडणे (सिंकोप) आणि हृदयाची धडधड या अशा रुग्णांचे वैद्यकीय भाषेत कार्डियाक ॲरिथमिया अशा आजारांचे निदान केले जाते. ईपी लॅबच्या साहाय्याने या आजारांचे निदान आणि उपचार दोन्ही केले जातात.
हृदयाच्या ठोक्यांची गती, त्यांमधील अनियमितता याचे निदान या लॅबमध्ये केले जाते आणि त्यावर उपचारही केले जातात. सध्या अशा पद्धतीचे उपचार खासगी रुग्णालयांत उपलब्ध आहेत.
त्यामुळे शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना त्यासाठी खासगी रुग्णालयांत जावे लागत असे. शासकीय रुग्णालयांत ही सेवा उपलब्ध केल्याने रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
सुविधा कोणत्या रुग्णालयांत?
जे.जे. रुग्णालय (मुंबई)
ससून रुग्णालय (पुणे)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर)
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (अकोला)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मिरज)
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सोलापूर)
हृदयाच्या विद्युत प्रणालींचे निरीक्षण आणि नकाशा तयार करण्यासाठी तसेच हृदयाच्या लय समस्यांवर (कार्डियाक ॲरिथमिया) उपचार करण्यासाठी ईपी लॅबचा उपयोग होणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत रुग्णांना मोफत उपचार मिळतील. जे.जे. मध्ये महिन्याला १० ते १२ रुग्ण या उपचारासाठी येतात, मात्र आम्ही त्यांना उपचार देऊ शकत नव्हतो. आता तो प्रश्न मिटला आहे - डॉ. कल्याण मुंडे, हृदयरोगशास्त्र विभाग प्रमुख, जे.जे. रुग्णालय