मुंबई : कोविड रुग्णांची सातत्याने वाढती संख्या पाहून मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने कोविड केअर आश्रम तयार केला असून या माध्यमातून रुग्णांवर निसर्गाच्या सानिध्यात उपचार केले जात आहेत. योगा, ध्यानधारणेच्या माध्यमातून बीपीटी कोविड आश्रमात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सत्तर रुग्णांसाठी ही व्यवस्था तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी रुग्णाला गरज भासल्यास ऑक्सिजन पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे
योगा, ध्यानधारणा, सकाळी व संध्याकाळी परिसरात चालण्याची सुविधा, सौर स्नान अशा विविध सुविधा पुरवण्यात येत आहेत. आश्रमातील विविध उपचार व वैद्यकीय उपचार या माध्यमातून रुग्ण कोविड मधून पूर्ण बरा होऊन घरी परत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कोविड केअर आश्रमात केवळ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना प्रवेश दिला जात आहे. ज्या रुग्णाचे वय पन्नास वर्षांपेक्षा कमी आहे, ज्या रुग्णामध्ये कोविडची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत, अशाच रुग्णांना या आश्रमात प्रवेश दिला जात आहे. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी या आश्रमात ऑक्सिजन पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. या शिवाय थर्मल स्क्रीनिंग व रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा तपासण्यासाठी ऑक्सीमीटर देखील या आश्रमात ठेवण्यात आले आहेत.
या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना एका मोठ्या सभागृहात योगा व ध्यान धारणा करण्याची सुविधा पुरवण्यात आली असून त्यांना ऑनलाईन पध्दतीने सूचना, मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्याची सोय आहे. येथे दाखल केलेल्या रुग्णाला त्याच्यावर उपचार सुरु आहेत किंवा त्याला कोविड 19 ची लागण झाली आहे याचा पूर्ण विसर पडेल असे वातावरण तयार करण्यात आले आहे. रुग्णावर कोणताही मानसिक किंवा शारीरिक ताण येऊ नये याची सर्व काळजी घेऊन तशी परिस्थिती तयार करुन नैसर्गिक पध्दतीत कोविड चा सामना यशस्वीपणे करुन रुग्ण कोविड मधून बाहेर पडून घरी जाईल अशी पध्दती विकसित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने बीपीटी रुग्णालयाचे या पूर्वीच कोविड रुग्णालयात रुपांतर केले आहे. त्या ठिकाणी 120 खाटा कोविड रुग्णासाठी व स्वतंत्र 25 खाटा सर्वसामान्य रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या कोविड रुग्णालयात 611 रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट चे अध्यक्ष संजय भाटिया यांनी दिली.