लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयांतील पोस्ट ओपीडीत ३८६, तर गोरेगाव नेस्को येथील पोस्ट ओपीडीत १४० अशा एकूण ५२६ काेराेनामुक्त रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
पालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयांतील पोस्ट ओपीडी विभागात १२ डिसेंबरपर्यंत तपासणीसाठी आलेल्या कोरोनामुक्त ३८६ रुग्णांना न्यूमोनिया, श्वसनाचा त्रास, हात व पायांचे सांधे दुखणे, तणाव हे आजार असल्याचे समोर आले. यातील २२४ पुरुष, तर १६२ महिला रुग्ण आहेत. कोरोनाची लागण होण्यात पुरुषांची संख्या अधिक होती. कोरोनानंतरच्या आजारातही पुरुषांची संख्या अधिक आहे. २२४ पुरुष तर १६२ महिलांना कोरोनानंतरही अन्य आजारांची लागण झाल्याचे समोर आले.
शहर, उपनगरांत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून रुग्णही कोरोनामुक्त होत आहेत. मात्र, कोरोनामुक्त झाल्यावर त्यांना इतर आजार होत असल्याने उपचारासाठी पालिका रुग्णालय आणि कोविड केंद्रांमध्ये पोस्ट ओपीडी विभाग सुरू करण्यात आले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नायर व केईएम रुग्णालयांतील पोस्ट ओपीडीत आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ८० टक्के नवीन केसेस, तर २० टक्के जुन्या केसेस होत्या. तर, १ डिसेंबरनंतर पोस्ट ओपीडीत येणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. १२ डिसेंबरपर्यंत पोस्ट ओपीडीत ३८६ कोरोनामुक्त रुग्ण विविध आजारांमुळे त्रस्त असल्याने उपचारासाठी आले होते. यामध्ये २२४ पुरुष तर १६२ महिला कोरोनामुक्त रुग्ण असून त्यांना अन्य त्रास होत असल्याचे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.
* नेस्को केंद्रात समुपदेशन, रक्ततपासणी माेफत
गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड केंद्रात काेराेना रुग्णांची संख्या कमी झाल्याने तेथे ३० नोव्हेंबरपासून पोस्ट ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबर ते आतापर्यंत १४० कोरोनामुक्त रुग्ण त्रास होत असल्याने पुन्हा तपासणीसाठी आले. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान, नेस्को जम्बो कोविड सेंटरमधील पोस्ट ओपीडीत रक्ततपासणी, छातीचा एक्सरे, आरटीपीसीआर, समुपदेशन, तापावर औषध हे सर्व रुग्णांना मोफत देण्यात येत असल्याचे पोस्ट ओपीडीच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.
..............................