मंदीवर स्वयंरोजगाराचा इलाज, मुख्यमंत्र्यांची रोजगार योजना सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 06:04 AM2019-09-04T06:04:23+5:302019-09-04T06:04:30+5:30
उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले, बँका कर्ज देताना तारण मागतात
मुंबई : मंदीच्या काळात विविध उद्योगांमध्ये नोकर कपात होत असल्याच्या बातम्या असताना राज्यात स्वयंरोजगाराद्वारे मोठी रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला. यावर्षी योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून पुढील वर्षी २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात १० लाख २७ हजार लघुउद्योग मागील पाच वर्षांत सुरू झाले आहे. ५९ लाख ४२ हजार रोजगार निर्मिती क्षमता आहे. देशात तयार झालेल्या एकूण रोजगारापैकी २५ टक्के रोजगार निर्मिती राज्यात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमात लाभार्र्थींचा वाटा केवळ १० टक्के इतकाच असेल. उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून तसेच बँकांकडून कर्ज स्वरुपात दिली जाणार आहे. येत्या पाच वर्षांत एक लाख स्वयंरोजगार निर्माण करून त्याद्वारे १० लाख जणांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. स्वयंरोजगारासाठीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांचे अभिनंदन केले.
उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले, बँका कर्ज देताना तारण मागतात. तारण ठेवण्याची अट या योजनेतून रद्द केलेली आहे. उद्योजकांच्या कर्जफेडीची हमी आम्ही घेतली आहे. सोप्या सुटसुटीत पद्धतीने विनाअडथळा ही प्रक्रिया पूर्ण होईल.
यावेळी राज्यमंत्री अतुल सावे, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पी.अनबलगन आदी उपस्थित होते.