कोरोनाच्या संशयित रुग्णांवर कस्तुरबामध्ये उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:56 AM2020-01-25T06:56:37+5:302020-01-25T06:57:48+5:30

चीनमध्ये प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसचे तीन संशयित रुग्ण महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत.

Treatment of suspected coronary patients in Kasturba Gandhi Hospital | कोरोनाच्या संशयित रुग्णांवर कस्तुरबामध्ये उपचार

कोरोनाच्या संशयित रुग्णांवर कस्तुरबामध्ये उपचार

Next

मुंबई : चीनमध्ये प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसचे तीन संशयित रुग्ण महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच खबरदारी म्हणून मुंबई विमानतळावर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत चीन आणि हाँगकाँगवरून आलेल्या १,७३९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या देशातून मुंबईत येणाºया प्रवाशांची तपासणी करण्यास पालिकेने १८ जानेवारीपासून सुरुवात केली आहे. २२ जानेवारी रोजी चीनवरून आलेल्या दोन प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना तातडीने कस्तुरबा रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले आहे. दर दुसरा रुग्ण हाँगकाँगवरून गुरुवारी मुंबईत आला आहे. दोन रुग्ण वसई तर एक पालघरचा राहिवासी आहे.
पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी या प्रयोगशाळेत या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी दोन रुग्णांच्या चाचणीचा अहवाल उद्यापर्यंत अपेक्षित असून त्यांना या आजाराची लागण झाली आहे का, हे त्यानंतरच स्पष्ट होईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

कस्तुरबामध्ये विशेष कक्ष
कस्तुरबा रुग्णालयात चार विशेष कक्ष तयार ठेवण्यात आले आहेत. या चार विशेष कक्षांत प्रत्येकी चार खाटा आहेत. प्रत्येक कक्षात
एक डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक ठेवण्यात आले आहे. तसेच या आजाराची लागण उपचार करणाºया डॉक्टर, नर्स यांना होऊ नये, यासाठी त्यांना हातमोजे, एप्रोन, मास्क घालण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन
खोकला, कफ, ताप आणि हिवतापासारखी लक्षणे असतील आणि नेहमीच्या उपचाराने आजार बरा होत नसेल तर तत्काळ कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी यावे, असे आवाहन पालिकेने केले.

मुंबईकरांना घाबरण्याचे कारण नाही
चीन आणि हाँगकाँगवरून येणाºया प्रवाशांची तपासणी विमानतळावर केली जात आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली तरच त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले जात आहे. मात्र मुंबईकरांना घाबरण्याचे कारण नाही.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

 


मुंबईतील विमानतळावर थर्मल स्क्रीनद्वारे तपासणी

मुंबई : चीनमधील नोव्हेल कोरोना व्हायरसचा हवाई मार्गाने देशात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशातील विमानतळावर चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाºया प्रवाशांची थर्मल स्क्रीनद्वारे तपासणी केली जात आहे. मुंबई व चीनमध्ये एअर चायना व र्वँड एअर
या विमान कंपन्यांद्वारे हवाई वाहतूक केली जाते.
देशभरातील विविध विमानतळांवर आलेल्या ९६ विमानांतील २० हजार ८४४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. तर मुंबईत सात दिवसांत १७३९ जणांची तपासणी करण्यात आली. मुंबईत उतरणाºया प्रवाशांपैकी कोणालाही याची लागण झाल्याची शक्यता असल्यास त्यांना यावरील उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या आयसोलेटेड कक्षात पाठवण्यात येणार आहे. मुंबईतील दोन जणांना सर्दी, ताप असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Web Title: Treatment of suspected coronary patients in Kasturba Gandhi Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.