मुंबई : चिंचोली बंदर परिसरात मंगळवारी रात्री जांभळाचे झाड बेस्टच्या बसवर कोसळले. सुदैवाने त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. झाडाच्या फांद्या व बस बाजूला काढण्यात वेळ लागल्याने, सुमारे दीड ते दोन तास वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.गोरेगाववरून दहिसरला जाणारी बेस्टची २०५ रूट क्रमांकाची प्रवाशांनी भरलेली बस, चिंचोली बंदर रोडवरून लिंक रोडच्या दिशेने जात होती. वाहतुकीच्या कोंडीमुळे मोटार सायकलस्वार बसच्या बाजूने रस्ता काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी जांभळाचे झाड उन्मळून पडले.झाडाच्या फांद्या बसवर पडल्याने, मोटारसायकलस्वार बचावले, अशी माहिती स्थानिक रहिवाशी हरेश साळवी यांनी दिली.वाढलेल्या झाडांची छाटणी वेळेत करत नसल्याने, हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान , सव्वानऊच्या सुमारास झाड बाजूला हटविण्याचे कामरात्री साडेदहापर्यंत सुरू होते.त्यामुळे वर्दळीवरील मार्गातील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.गेल्या वर्षी ३० जुलैला सुंदरनगर परिसरात एका झाडाची मोठी फांदी अंगावर पडल्याने, पराग पावस्कर नावाच्या ‘अकाउंटंट’ला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही पालिकेच्या पी. दक्षिण विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
चिंचोली बंदरमध्ये बेस्ट बसवर झाड कोसळले, सुदैवानं जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 2:25 AM