मुंबई : मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहासमोर गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विजेच्या खांबावर झाड कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच उद्यान विभागासह बेस्ट विद्युत पुरवठा अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या हटविण्यासाठी तब्बल दीड तासाहून अधिक वेळ लागला. रात्री नऊ वाजेपर्यंत झाड हटविण्याचे काम सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती.वाळकेश्वरमधील मलबार हिल परिसर उच्चभ्रू वस्तीचा म्हणून ओळखला जातो. महत्त्वाचे म्हणजे मलबार हिल परिसरात सह्याद्री अतिथीगृहासह अनेक दिग्गजांचे बंगले आहेत. शिवाय मंत्र्यांचाही परिसरात नेहमी राबता असतो. परिसरातील रस्त्यांवर दिवसभर मंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यासह ब्रॅण्डेड वाहनांची वर्दळ असते. सर्वसाधारणरीत्या हा परिसर वाहतूककोंडीचा नसला तरी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास येथील बी.जी. खेर मार्गावरील झाड लगतच्या विजेच्या खांबावर पडले. शिवाय झाडाचा काही भाग रस्त्यावरही पडला. या घटनेची माहिती मुंबई महापालिका नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि बेस्ट विद्युत विभागाचे अधिकारी दाखल झाले.वाहतूक पोलिसांनी प्रथमत: येथील वाहतूक थांबवली. तीन बत्तीवरून जे. मेहता मार्गावर वाहतूक वळवण्यात आली. बी.जी. रोडवरून भाऊसाहेब हिरे मार्गावर वाहतूक वळवण्यात आली. तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाड बाजूला सारण्याचे काम हाती घेण्यात आले. अखेर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर पडलेले झाड पूर्णत: बाजूला काढण्यात आले. (प्रतिनिधी)
सह्याद्री अतिथीगृहाजवळ झाड कोसळले
By admin | Published: March 04, 2016 2:10 AM