आता लोकसहभागातून होणार महामार्ग हिरवागार, वृक्षारोपणातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 03:07 AM2019-05-08T03:07:08+5:302019-05-08T03:07:33+5:30
सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची होणारी हानी यामुळे तापमानात वाढ होत आहे. विकास होत असतानाच मोठी वृक्षतोड होत आहे. परिणामी, वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
मुंबई : सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची होणारी हानी यामुळे तापमानात वाढ होत आहे. विकास होत असतानाच मोठी वृक्षतोड होत आहे. परिणामी, वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या कारणास्तव पाऊस अनियमित होत आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक असून, केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. याकरिता ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा मंत्र जपण्याची गरज असून, यासाठी युवा स्वराज्य संस्था महामार्गावरील पट्ट्यात लोकसहभागातून वृक्षारोपणास सरसावली आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील युवांनी एकत्र येत स्थापन केलेली युवा स्वराज्य संस्था महामार्गावरील पट्ट्यात लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यासाठी सरसावली आहे. या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, सामाजिक संस्थांना सहभागी होण्याकरिता साद घातली जात आहे. त्यासाठी कोकण, मुंबई-गोवा जुन्या महामार्गासह परभणी, वर्धा, अकोला, अमरावती, अहमदनगर, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे वृक्षारोपणाचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी फेसबुकवरील युवा स्वराज्यच्या ग्रुपवर संपर्क साधता येईल. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, वृक्ष-पर्यावरणप्रेमी नागरिकांना यात सहभागी होता येईल, अशी माहिती युवा स्वराज्यचे अध्यक्ष संदीप सावंत यांनी दिली.
अशी राबविण्यात येणार मोहीम
पिंपळ, आंबा, चिंच, वड, जांभूळ, कडुलिंब, बकूळ, बाहावा, कांचन, करंज यांसारख्या वृक्षांचे पावसाळ्यापूर्वी रोपट्यांमध्ये रूपांतर करून महामार्ग हरित करण्याचा हेतू आहे. महामार्गावरील स्थानिक गावकऱ्यांची मदत मिळाल्यास उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लागेल.
पर्यावरण व पाण्याचे महत्त्व ओळखूनच वृक्षारोपणाचा उपक्रम आखला जात असून त्यासाठी एखाद्या रोपट्यानेही हातभार लावता येईल. उपक्रमासाठी सेलीब्रिटी व दात्यांनीही पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यात लाखो झाडांची कत्तल होत आहे.
तापमानात वाढ झाल्याने उष्णतेची लाट वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे मानवासहित सर्व पशुपक्ष्यांची अक्षरश: होरपळ होत आहे.
पिके, शेती आणि मानवी आरोग्यावरही उन्हाच्या झळांचा दुष्परिणाम होत आहे.
उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असतानाच पाणीटंचाईचे भीषण संकट आहे. तीव्र उन्हाळा, भीषण पाणीटंचाईने महाराष्ट्र होरपळला आहे. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.