मुंबईतील कोंडी फोडण्यासाठी ‘ताडोबा’त वृक्षलागवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 02:04 AM2019-12-08T02:04:12+5:302019-12-08T06:01:55+5:30
जीएमएलआर प्रकल्पातील अडथळा दूर होणार; व्याघ्र प्रकल्पालगत जंगल उभारणार
मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसएनजीपी) भुयारी मार्गाच्या मोबदल्यात नुकसानभरपाई स्वरूपात दुप्पट जमीन देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत १९.४३ हेक्टर जागेवर वनीकरण करण्यात येणार आहे. यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच मुंबईतील पूर्व-पश्चिमेचा प्रवास सुसाट करणाऱ्या जीएमएलआर प्रकल्पालाही वेग मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये उपनगरात विशेषत: पश्चिम उपनगरातील वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे़ दररोज या वाहतूककोंडीत मुंबईकरांचा अमूल्य वेळ वाया जात आहे़ या कोंडीतून सुटका करण्यासाठी महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प पालिकेने आखला आहे़ मात्र या प्रकल्पाच्या मार्गात अनंत अडचणी येत असल्याने बराच काळ जीएमएलआरची गती मंदावली होती. मात्र राष्ट्रीय वन विभागाच्या मंजुरीनंतर आता राज्य वन विभागाकडून परवानगी मिळविण्याच्या प्रयत्नांनाही वेग आला आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा एकूण १२.२ कि़मी़ असणार आहे. यामध्ये एसएनजीपी ४.७ कि़मी़चा बोगदा काढण्यात येणार आहे.
तर फिल्मसिटीतून १.६ कि़मी़चा कट अॅण्ड कव्हरचा बोगदा काढण्यात येणार आहे. या प्रकल्पाला परवानगी मिळविण्यासाठी शासनाच्या अटीनुसार चंद्रपूर येथे वनीकरणाकरिता भूसंपादन करण्यात येणार आहे.
गोरेगाव-मुुलुंड जोड रस्ता प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाºया बोगद्यामुळे १९.४३ हेक्टर जमीन बाधित होणार आहे. या जागेच्या बदल्यात तेवढीच खासगी जमीन उपलब्ध करून देण्याची अट वनखात्याच्या प्रादेशिक अधिकारी समितीकडून घालण्यात आली होती.
वनखात्याशी केलेल्या चर्चेनुसार ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत मौजे गोंड मोहाडी आणि मौजे वासनविहीरा जिल्हा चंद्रपूर येथे पर्यायी जमीन शोधण्यात आली आहे़ सहा महिन्यांत जमीन संपादनाचे काम पूर्ण करण्यासाठी दोन लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.