Join us

विकासकामे झाडांच्या मुळांवर? जलवाहिनी, रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी जुन्या झाडांवर कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 10:00 AM

शहरातील वाढती विकासकामे, प्रकल्प आणि बांधकामे यांचा फटका वृक्षांना बसत आहे.

मुंबई : शहरातील वाढती विकासकामे, प्रकल्प आणि बांधकामे यांचा फटका वृक्षांना बसत आहे. बोरिवलीच्या श्रीकृष्णनगर येथे रस्ता रुंदीकरण आणि जलवाहिनीच्या कामात अडथळा ठरत असल्याने ४७ झाडांची कत्तल पालिकेकडून केली जाणार आहे. यामधील केवळ १० झाडे पुनर्रोपित करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने दिली आहे. दरम्यान, त्यातील बहुतांश झाडे ही ५० वर्षांहूनही अधिक जुनी असल्याने पालिका विकासाच्या नावाखाली शहरातील हरित आच्छादन संपविण्याच्या प्रयत्नात असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मुंबईतील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळे २०२३ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी 'जागतिक वृक्ष नगरी'चा पुरस्कार पटकावून पालिकेने आपली पाठ थोपटवून घेतली होती. असे असतानाच दुसरीकडे मुंबईतील विविध भागांत सरकारी आणि पालिका प्रकल्पांसाठी शेकडो झाडांची कत्तल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पालिकेचे दुटप्पी धोरण?

पालिकेने मुंबईतील महामार्गासह इतर ठिकाणी बांबूची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे तर, दुसरीकडे विविध प्रकल्पांसाठी वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे पालिकेला मुंबईत हरित आच्छादन हवे की नको? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आहे. जुन्या झाडांची कत्तल करून पालिका दुटप्पी धोरण राबवत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

झाडांची कत्तल, कुठे आणि कशी?

१) पूर्व मुक्त मार्गाचा सध्याचा सव्र्व्हिस रोड वाढवण्यासाठी ३८२ झाडे हटवावी लागणार आहेत. त्यातील ३१६ झाडांची कत्तल केली जाणार आहे, तर केवळ ६६ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

२) हार्बर रेल्वे मार्गावरील गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. या कामाआड मालाड पूर्व आणि पश्चिम बाजूने झाडे कापण्याचे दोन प्रस्ताव पश्चिम रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांनी (बांधकाम) तयार केले आहेत. त्यात पूर्वेकडे १३०, तर पश्चिमेला २२७ झाडे काढावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कांदिवली येथील लालजीपाडा प्रस्तावित पुलासाठी चार झाडे तोडणे प्रस्तावित आहे.

३) मुंबईत सांताक्रूझ भागातील एसव्ही रोडवरील ३०० वर्ष जुने असलेले गोरखचिंचेचे झाड एमएमआरडीएने हटविले आहे. मुंबई मेट्रो -२ बी मधील सांताक्रूझ स्थानकाच्या उभारणीत ते अडसर ठरत होते. हे झाड तोडू नये म्हणून नागरिकांनी मोर्चाही काढला होता.

टॅग्स :मुंबईनगर पालिका