होळीसाठी झाडे तोडली जात आहेत? १९१६ या क्रमांकावर करा तक्रार
By जयंत होवाळ | Published: March 21, 2024 07:36 PM2024-03-21T19:36:36+5:302024-03-21T19:37:32+5:30
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वृक्षतोड करू नये.
मुंबई: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच ‘होळी’च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास महापालिका अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिस ठाण्यास कळवावे किंवा पालिकेच्या १९१६ या 'टोल फ्री' क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी १ हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. शिवाय एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा देखील होऊ शकते.