नवी मुंबई : शहरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. गरमीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी मुसळधार पावसाने रेल्वे सेवा कोलमडल्यामुळे चाकरमान्यांची गैरसोय झाली. चार ठिकाणी वृक्ष कोसळल्याची घटना घडली आहे. जुलै सुरू झाला तरी पाऊस पडत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. जुलैमध्येही मेप्रमाणे गरमीला सामोरे जावे लागत होते. मंगळवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्याने नवी मुंबईकर सुखावले. सकाळी मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूकही कोलमडल्याने नागरिकांना कामावर जाण्यास उशीर होत होता. नेरूळला ११.४५ ला येणारी सीएसटी लोकल अर्धा तास उशिरा आली. सानपाडा स्टेशनच्या पुढे पुन्हा लोकल जवळपास २० मिनिटे थांबविली होती. यामुळे दहा मिनिटाचे अंतर पूर्ण करण्यास नागरिकांना पाऊण तास खर्च करावा लागला. पावसामुळे अशाप्रकारे गैरसोय सुरूच होती. पावसामुळे शिरवणे गाव गणेश मंदिर, कोपरखैरणे सेक्टर ४, नेरूळ निलगिरी गार्डन व वाशी सेक्टर १ मधील मच्छी मार्केटजवळ वृक्ष कोसळल्याची घटना घडली आहे. बाजार समितीच्या भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. येथून ये - जा करणाऱ्या नागरिकांचीही गैरसोय होत होती. (प्रतिनिधी)
चार ठिकाणी वृक्ष कोसळले
By admin | Published: July 03, 2014 1:46 AM