Join us

३६१ ठिकाणी झाडे कोसळली, १९१६ वर आले ३ हजार २०२ कॉल,  २ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 4:51 PM

१९१६ या मदत क्रमांकावर ३ हजार २०२ दूरध्वनी प्राप्त झाले.

मुंबई :  मुंबई शहर आणि उपनगरात कोसळधारा सुरु असतानाच गुरुवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंत मुंबईत तब्बल ३६१ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. यात शहरात २७४, पूर्व उपनगरात ४० आणि पश्चिम उपनगरात ४७ ठिकाणी झाडे कोसळली. कुर्ला येथील हॉल व्हिलेज लगतच्या ग्लीप परेरा चाळीवर झाड पडले. यात जखमी झालेल्या केन डिसुजा यांना कुपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी मरिन लाइन्स व चर्नी रोडच्या दरम्यान रेल्वे रुळावर झाड पडले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक काही काळ बंद होती. चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तर मंबई सेंट्रल ते विरारपर्यंतची वाहतूक सुरळीत होती. 

मुंबई शहरात ४८ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी अशा एकूण ५७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. दहिसर येथे बुधवारी सकाळी माईल स्टोन सोसायटी परिसरात शॉक लागून एक जण जखमी झाला. कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात  सदर व्यक्तीला उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वी रुग्णालयाने त्यास मृत घोषित केले. मृताचे नाव शंभु सोनी (३८) असे आहे. तर मस्जिद बंदर येथे गुरुवारी पहाटे रेल्वे कर्मचारी संजीव (३२) यांना शॉक लागला. त्यांना मुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. 

१९१६ या मदत क्रमांकावर ३ हजार २०२ दूरध्वनी प्राप्त झाले. ३६१ ठिकाणी झाडे कोसळली. शॉर्ट सर्किट घडू नये म्हणून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या तीन ते चार लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चिंचपोकळी दरम्यान अडकल्या होत्या. यातील ८० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. फोर्ट ते कुर्ला या मार्गावर ८३ बेस्ट बसची व्यवस्था करण्यात आली होती. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटपाऊसमुंबईमुंबई महानगरपालिका