जोगेश्वरीतील मियावाकी जंगलातील झाडांची झाली आठ महिन्यांत दहापट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:37 AM2019-09-30T03:37:42+5:302019-09-30T03:38:12+5:30
जोगेश्वरी पूर्वेकडील कमी जागेमध्ये ‘ग्रीन यात्रा’तर्फे ‘मियावाकी’ पद्धत वापरून छोटे जंगल निर्माण केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३० प्रकारच्या प्रजातींची झाडे लावण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ५० प्रकारच्या प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.
मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील कमी जागेमध्ये ‘ग्रीन यात्रा’तर्फे ‘मियावाकी’ पद्धत वापरून छोटे जंगल निर्माण केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३० प्रकारच्या प्रजातींची झाडे लावण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ५० प्रकारच्या प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. आता एकूण सात हजारांहून अधिक झाडांचे जंगल उभारण्यात आले आहे. ‘मियावाकी अर्बन डेन्स फॉरेस्ट’ या पद्धतीमध्ये प्रत्येक महिन्याला एक-दोन फुटांपर्यंत झाडांची वाढ होते. जंगलातील सामान्य झाडांपेक्षा ही झाडे दहा पट वेगाने वाढत आहेत.
फणस, कांचन, करंज, लिंबू, भेंडी, बकुळी, ताम्हण, कडुनिंब इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली आहे. झाडांसाठी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरले जात नाही, तर फक्त सेंद्रीय खतांचा वापर केला जातो. हे मुंबईतले पहिले छोटे जंगल आहे. शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी होत आहे़ वातावरणात बदल होत आहेत. हा बदल थांबविण्यासाठी कमीतकमी जागेत जापनीज मियावाकी पद्धत वापरून जंगल निर्माण केले पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला पाहिजे, अशी माहिती ग्रीन यात्रा संस्थेचे संस्थापक प्रदीप त्रिपाठी यांनी दिली.
वन्यजीव सप्ताह
मुंबई : धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था, नॅचरॅलिस्ट फाउंडेशन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी वन्यजीव सप्ताह १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान महाराष्ट्र निसर्ग उद्यानात साजरा करण्यात येणार आहे. या वन्यजीव सप्ताहमध्ये महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या कलादालनात भारतातील सागरी जैवविविधता या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा १ आॅक्टोबर रोजी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजता होईल.