Join us

वांगणीच्या धबधब्यावर भिजण्यासोबत ट्रेकिंग फ्री

By admin | Published: June 29, 2015 4:34 AM

चंदेरी, नाकिंदा आणि पेप या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फेसाळणारा वांगणीचा भगीरथ धबधबा हा पर्यटकांच्या चांगलाच पसंतीत उतरला आहे.

पंकज पाटील, बदलापूरचंदेरी, नाकिंदा आणि पेप या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये फेसाळणारा वांगणीचा भगीरथ धबधबा हा पर्यटकांच्या चांगलाच पसंतीत उतरला आहे. या धबधब्याचा मार्ग डोंगरावरुन असल्याने पर्यटकांना ट्रेकिंगचा आणि धबधब्यावर भिजण्याचा असा दुहेरी आनंद घेता येता. हा धबधवा तसा सुरक्षित समजला जातो.वांगणी गांव हे ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यावर आहे. वांगणी गावापासून पाच किमीच्या अंतरावर डोंगर द-यातून भगिरथ धबधबा वाहत आहे. तेथे पोहचण्यासाठी डोंगराची वाट चढावी लागते. डोंगर चढल्यावर पुन्हा धबधब्याकडे येण्यासाठी दुस-या डोंगराची वाट खालच्या दिशेने उतरावी लागते. उतरणीची वाट किंचित अवघड असली तरी सोबत सहकारी असल्यास अवघड वाटणारी वाट सोपी होते. धबधब्याच्या ठिकाणी जास्त खोली नसल्याने पर्यटकांना धबधब्याखालीच भिजण्याचा आनंद घेता येतो. त्याचे पाणी ज्या मार्गाने खाली जाते त्या मार्गावर खाली बंधारा उभारण्यात आला आहे. अनेक पर्यटक या बंधा-यात उतरण्याचा प्रयत्न करतात. मात्र डोंगरावरुन येणारी माती या बंधा-यात जमा झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झाला आहे. त्यामुळे पोहण्यासाठी उतरलेला पर्यटक या गाळात अडकून बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधा-याजवळ न जाता पर्यटकांनी केवळ धबधब्याचा आनंद घेतल्यास हे ठिकाणी सुरक्षित आहे.या धबधब्याकडे जाण्यासाठी रेल्वेने येणा-या पर्यटकांनी वांगणी स्थानक गाठावे. तेथून थेट धबधब्याच्या डोंगराजवळ रिक्षने जाता येते. पायी जाणा-यांनी वांगणी गावामार्गे धबधब्याच्या ठिकाणी जावे. खाजगी गाडीने जाणा-या पर्यटकांनी बदलापूरमार्गे कर्जतच्या दिशेने यावे. वांगणी गाव लागल्यावर धबधब्याचे ठिकाण विचारत डोंगरापर्यत यावे. तेथून चालत धबधब्यावर पोहचता येते. मुख्य धबधब्यासोबत या डोंगरात अनेक लहान धबधबे वाहत आहेत. मात्र येथे पोहचण्याचा मार्ग अवघड आहे. धबधब्यापासून काही अंतरावर डोंगरवरुन वाहणा-या पाण्याचा ओढा आहे. या ओढ्यातही भिजण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. कुटुंबासह येथे पिकनिकसाठी येणा-यांसाठी हे ठिकाण सुरक्षित आहे.४धबधब्याच्या ठिकाणी अनेक पर्यटक मद्यपान करित असल्याने दारुच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच या ठिकाणी आहे. त्या पर्यटकांच्या पायाला लागण्याची भिती असल्याने शक्यतो पाण्यात उतरतांना पावसाळी सॅडल किंवा बुट वापरावे. ४या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हॉटेल्स नसल्याने पर्यटकांनी जेवण सोबतच आणावे किंवा धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर वांगणी रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये किंवा बदलापूर-कर्जत महामार्गावरील धाब्यांवर जेवण घ्यावे लागेल.