मुंबई : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये मंगळ मोहिमेचा थरार आता खगोलप्रेमींना अनुभवता येणार आहे. भारताच्या इस्रोचे ‘मंगळ यान’ आणि अमेरिकेच्या नासाचे ‘मावेन’ ही दोन्ही याने एका दिवसाच्या अंतराने मंगळाच्या कक्षेत दाखल होणार आहेत. या मंगळस्वारीचा विजयोत्सव वांद्रे येथील बॉम्बे कनेक्टमध्ये साजरा करण्यात येणार आहे.इंडियन अॅस्ट्रोबायोलॉजी रिसर्च सेंटरकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘मावेन’ हे यान २२ सप्टेंबरच्या रात्री मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल झालेले असेल आणि ‘मंगळ यान’ हे २४ सप्टेंबर रोजी मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करेल. भारताची ही पहिलीच मंगळस्वारी असल्याने खगोलप्रेमींना या मोहिमेची माहिती देण्यासाठी सेंटरच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान वांद्रे येथील बॉम्बे कनेक्टमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी मावेन आणि मंगळ यान मोहिमेची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात येणार आहे. शिवाय अमेरिकेतील प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड ग्रीनस्पून हेदेखील मंगळ मोहिमेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती खगोलशास्त्रज्ञ व केंद्राचे प्रमुख पुष्कर गणेश वैद्य यांनी दिली.१८ नोव्हेंबर २०१३ रोजी नासाचे मावेन नावाचे मंगळ यान पृथ्वीवरून निघाले होते. १० महिने आणि ४४२ मिलिया मैल प्रवास करून ते आता मंगळावर पोहोचणार आहे. हे यान मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे. तेथील पाणीसाठ्याबाबतही अधिक संशोधन करण्यात येणार आहे. भारताचे मंगळ यान हे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी पृथ्वीवरून मंगळाकडे रवाना झाले. २२ किमी प्रति सेकंदाच्या गतीने आणि १० महिन्यांच्या प्रवासानंतर ते २४ नोव्हेंबरला सकाळी ७.३० वाजता मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. मंगळ यानाचा उद्देश तेथील भूूकवचाचा, वातावरणाचा अभ्यास करणे, अवकाशीय प्रवासाचे तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे. (प्रतिनिधी)
भारत-अमेरिकेच्या मंगळ मोहिमेचा थरार
By admin | Published: September 22, 2014 1:36 AM