Join us

मागील काही वर्षांमध्ये यूपीएससी परीक्षेला बसण्याचा कल वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:07 AM

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा अशा अनेक देशपातळीवरच्या परीक्षांसाठी अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा निकाल ...

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा अशा अनेक देशपातळीवरच्या परीक्षांसाठी अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. देशभरात आता महाराष्ट्रातील यूपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडादेखील वाढत आहे. महाराष्ट्रातली मुले आता यूपीएससी परीक्षेचे लक्ष ठेवत आहेत.

पालकांकडूनदेखील त्यांना सहकार्य मिळत आहे. याआधी बँकिंग क्षेत्रात करियर घडविण्याकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असायचा, आता यूपीएससीला बसणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भविष्यात यूपीएससीची तयारी सोपी जावी यासाठी अनेक विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यावरच यूपीएससीच्या अभ्यासक्रमाची तयारी करत आहेत.

लक्ष्य अकॅडमीचे अजित पडवळ सांगतात की गेल्या दोन वर्षांमध्ये यूपीएससीचे महत्त्व अधिकच वाढले आहे. कारण कोरोनाच्या काळात पालकांना व विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीचे महत्त्व समजले आहे. महाराष्ट्रातील मुलं देखील आता यूपीएससीचे लक्ष ठेवत आहेत आणि पालकांकडूनदेखील त्याला सहकार्य मिळत आहे.

सरकारने व शैक्षणिक संस्थांनी यूपीएससीसाठी अनुकूल वातावरण तयार करणे गरजेचे आहे. त्याने महाराष्ट्रातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आकडा अजून वाढू शकतो. तंत्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केल्यास यूपीएससी परीक्षा कठीण नाही. १८ ते २१ या वयात बुद्धीचा चांगला विकास होत असल्याने विद्यार्थ्यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यावर अभ्यासाला सुरुवात करायला हवी. यूपीएससीची तयारी केल्यामुळे सरकारच्या इतर विभागांमध्येदेखील नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. म्हणूनच यूपीएससीला मदर ऑफ ऑल एक्झाम असे म्हटले जाते.

दिवसातून आठ ते दहा तास यूपीएससीच्या तयारीसाठी अभ्यास केला तरी यूपीएससी परीक्षेत चांगल्याप्रकारे यश संपादन करता येऊ शकते. कॉलेज पासून यूपीएससीच्या अभ्यासाला वेळ दिला तरी शेवटच्या क्षणी अभ्यासाचा भार हलका होतो. या परीक्षेत यश संपादन करण्यासाठी अभ्यासात सातत्य फार गरजेचे आहे.