मुंबई : आमदार निवासात नागपूरचे आमदार अभिजीत वंजारी यांना दिलेल्या खोलीत परवानगीशिवाय राहणाऱ्या हर्षल हजारे या नागपूरनिवासी तरुणाविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंजारी यांचे मुंबईतील स्वीय सहायक विजय रामचंद्र गाळे (५३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालय येथील आकाशवाणी आमदार निवासात वंजारी यांना रूम नंबर १०६ देण्यात आली आहे. या ठिकाणी आमदार यांच्याकडे कामानिमित्ताने आलेले कार्यकर्ते त्यांच्या परवानगीने राहतात. याच खोलीमध्ये नागपूरच्या हर्षल हजारे याला सहा महिन्यांपूर्वी आमदार साहेबांच्या रूमवर राहण्यासाठी परवानगी दिली होती. त्यांच्या परवानगीचा कालावधी पूर्ण झाला आहे. १६ जून रोजी वंजारी यांच्या नागपूर येथील स्वीय सहायक अजिंक्य पवार यांच्याकडून मिळालेल्या माहितीत १६ जून ते २५ जूनपर्यंत ६ जणांना निवासस्थानात राहण्यास परवानगी देण्यात आल्याचे सांगितले.
१९ जून रोजी आमदार निवासात जाऊन चौकशी करताच हजारे हा तेथेच राहत असल्याचे दिसून आले. त्याला परवानगीशिवाय येथे राहता येणार नसल्याचे सांगताच, त्याने गाळे यांना विरोध केला. तो विनापरवानगी तेथे राहात असल्याचे लक्षात येताच त्याच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.