मुंबई : उदय बाग, घोरपडी, पुणे येथील चंपारत्न सोसायटीमधील इमारत क्र. ३ मधील राहत्या घरात स्वत:ची आई, पत्नी व मुलगी अशा तिघींचा सात वर्षांपूर्वी एकाच वेळी निघृण खून करणाऱ्या विश्वजीत केरबा मसालकर या नराधम तरुणाच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी शिक्कोमोर्तब केले.
तिहेरी खून, मधुसूदन कुलकर्णी या शेजाºयाच्या खुनाचा प्रयत्न करणे व पुरावे नष्ट करणे या गुन्ह्यांसाठी पुण्याच्या सत्र न्यायालयाने आॅगस्ट २०१६ मध्ये तेव्हा २५ वर्षांच्या असलेल्या विश्वजीतला फाशीसह तुरुंगवासाच्या अन्य शिक्षा ठोठावल्या होत्या. फाशी कायम करणे व विश्वजीतने केलेले अपील अशा दोन प्रकरणांची एकत्रित सुनावणी करून न्या. बी. पी. धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केला.
आरोपी विश्वजीतने मांडलेले बचावाचे सर्व मुद्दे फेटाळत खंडपीठाने नि:संदिग्धपणे जाहीर केले की, अभियोग पक्षाने समोर आणलेल्या साक्षी-पुराव्यांतून हे खून आरोपीनेच केले एवढा एकच निष्कर्ष निघतो. दि. ४ आॅक्टोबर २०१२ रोजी दु. ३ पूर्वी हे तीन खून झाले होते. आरोपीने त्याची आई शोभा व पत्नी अर्चना यांचा डोक्यात छिन्नी-हातोड्याचे धाव घालून तर किमया छोट्या मुलीचा नाक-तोंड दाबून घरातच खून केले होते. शेजारी राहणाºया मधुसूदन कुलकर्णी यांनी हे राक्षसी कृत्य पाहिले असावे या शक्यतेने विश्वजीतने त्यांच्यावरही हल्ला केला होता. मात्र डोक्याला गंभीर इजा होऊन त्यातून ते सुदैवाने वाचले होते.
विश्वजीत मगरपट्टा येथील डीटीएसएस कंपनीत मॅनेजर होता. मधुसूदन कुलकर्णी, जिच्याशी लग्न करण्यासाठी विश्वजीत वेडापिसा झाला होता ती त्याच्या कंपनीतील गौरी लोंढे, कंपनीमधील आणखी एक सहकारी अभिजित शिंदे, मित्र हाजी मस्तान शेख व अर्चनाचे वडील विजयकुमार सोनपेटकर यांच्या साक्षी आरोपीचे गुन्हे सिद्ध करण्यास निर्णायक ठरल्या.
विश्वजीतला गौरीशी लग्न करायचे होते व त्यासाठी तो पत्नी अर्चनाला घटस्फोट देणार होता व त्यासाठी ती तयार झाली नाही तर प्रसंगी तिचा खून करण्याची मानसिक तयारीही त्याने केली होती, हे या सर्वांच्या साक्षीतून निर्विवादपणे सिद्ध झाले. आरोपी समाजात राहण्यास धोकादायक आहे. खास करून त्याला फाशीखेरीज अन्य शिक्षा दिली तर आता दुसºयाशी लग्न करून संसार करत असलेल्या गौरीच्या व विरुद्ध साक्ष देणारे सासरे विजयकुमार यांच्या जीवालाही त्याच्यापासून धोका आहे, असे खंडपीठाने नमूद केले.
या सुनावणीत आरोपी विश्वजीतसाठी अॅड. डॉ. युग मोहित चौधरी व अॅड. पयोशी रॉय यांनी तर सरकारतर्फे सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर अरफान सेठ यांनी काम पाहिले. पत्नी अर्चना विश्वजीतला नकोशी झाली होती व कंपनीतील गौरी लोंढेशी त्याला लग्न करायचे होते. त्यासाठी प्रसंगी अर्चनाला यमसदनी पाठविण्याचीही तयारी आहे, असे सांगितल्यावर गौरीने लग्नास नकार दिला होता.पत्नी अर्चना व आई शोभा यांचा विश्वजीतच्या बाहेरख्यालीपणास विरोध होता.
४ आॅक्टोबर २०१२ रोजी हाजी मस्तान शेख या मित्राच्या लग्नाला जाण्यासाठी विश्वजीतने सुटी घेतली होती. दु. १२ ते ३ या दरम्यान त्याने आई, पत्नी व मुलीचे खून केले व शेजारी कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. घरात दरोडा पडला व त्यात हे खून झाले असे भासविण्यासाठी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करून ठेवले. एवढे करून क्रूरकर्मा विश्वजीत दु. ३ वाजता घराबाहेर पडला. हाजी मस्तानला भेटला, आॅफिसात जाऊन आला. साय ७.५ वाजता घरी आल्यावर त्याने घरात दरोडा पडल्याचा वानवडी पोलीस स्टेशनला फोन केला. सोसायटील इतरांना बोलावून आपल्या अनुपस्थितीत हे सर्व घडले असे दाखविण्याचा त्याने बनाव केला. परंतु त्याचा खोटेपणा उघड झाला. कारण त्याने जे दागिने चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले ते भिंतीवर लावलेल्या त्याच्या वडिलांच्या फोटोच्या तसबिरीमागे त्याने पाकिटात घालून लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. रक्ताने माखलेले हातोडाही त्यानेच टाकलेल्या ठिकाणहून पोलिसांना काढून दिला.