मुंबईत सर्वत्र तिरंगामय वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 02:29 AM2019-08-16T02:29:48+5:302019-08-16T02:29:53+5:30

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहरासह उपनगरात राष्ट्रध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मुंबईभर तिरंगामय वातावरण निर्माण झाले होते.

Triangular atmosphere everywhere in Mumbai | मुंबईत सर्वत्र तिरंगामय वातावरण

मुंबईत सर्वत्र तिरंगामय वातावरण

Next

मुंबई - स्वातंत्र्य दिनानिमित्तमुंबई शहरासह उपनगरात राष्ट्रध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मुंबईभर तिरंगामय वातावरण निर्माण झाले होते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी उपस्थित राहून मुंबईकरांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

गल्ली, नाका, चौक, गजबजलेला परिसर, छोटे रस्ते येथे देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. पुरुष शुभ्र वस्त्र आणि महिला तिरंग्याच्या रंगाची साडी परिधान करून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. लहान मुले मोठ्या उत्साहात शुभ्र वस्त्र परिधान करून हातात तिरंगा आणि फुगे घेऊन स्वातंत्र्य दिनाचा आनंद घेत होती.

मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वे मार्गावर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे मुख्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मध्य रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी राष्ट्रध्वज फडकविला. या वेळी आरपीएफच्या पथकाने सादर केलेल्या गार्ड आॅफ आॅनरचे त्यांनी निरीक्षण केले. कोकण रेल्वे मार्गावरील नेरूळ येथे स्वातंत्र्य दिन साजरा झाला. या वेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालयक संजय गुप्ता यांनी राष्ट्रध्वज फडकविला. पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट येथे राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. सुरक्षा दल व अग्निशमन दलातर्फे महापौरांना मानवंदना देण्यात आली.

युरोप खंडातील उंच पर्वत माउंट एलब्रुसवर फडकला तिरंगा
मुंबई : गिर्यारोहक वैभव ऐवळे आणि नीलेश माने यांनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसवर ७३ राष्ट्रध्वजांचे ध्वज-तोरण फडकवले. या दोघांनी माउंट एलब्रुस हा युरोपमधील सर्वात उंच पर्वत सर केला आहे. काळाचौकी येथे राहणारे गिर्यारोहक वैभव ऐवळे यांनी ध्वज-तोरण फडकावून राष्ट्रगीत गाऊन विश्वविक्रम केला.

अंध, विशेष विद्यार्थ्यांनी साकारला तिरंगा
भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या देशाप्रति भावना व्यक्त करता याव्या यासाठी फुलांचा तिरंगा साकारला होता. ५ ते १४ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी फुलांचा तिरंगा साकारला. फक्त फुलांच्या सुगंधाद्वारे त्या फुलाचा रंग ओळखून या दिव्यांग विद्यार्थ्यांनी झेंडा तयार केला.

श्रीरंग संस्थेतर्फे कलादिग्दर्शक सुमीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांनी ही किमया साधत विश्वविक्रम प्रस्थापित केला.

वडाळामध्ये अमली पदार्थविरोधी मिरवणूक
मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वडाळा - शीव कोळीवाडामध्ये नशामुक्त समाजासाठी मिरवणूक काढण्यात आली. सकाळी १० वाजता गुलशन ए बगदादजवळून या मिरवणुकीला प्रारंभ झाला.
यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, विविध मंडळांचे सदस्य, वडाळा सायन कोळीवाड्याचे सदस्य
मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष मोहित भारतीय यांच्या नेतृत्वाखाली वर्सोवा येथे काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीत स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता लोखंडवाला जॉगर्स पार्क या ठिकाणावरून रॅली सुरु झाली. मिल्लतनगर, ओशिवरा पोलीस स्टेशन, बेहराम बाग, एस.व्ही. रोड आदी परिसरातील छोट्या मोठ्या गल्लीतून निघालेल्या रॅलीची दुपारी १ वाजता कोळी गावात सांगता झाली.

Web Title: Triangular atmosphere everywhere in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.