महेश गुजराथीचांदवड : पानी फाउंडेशनच्या स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील मतेवाडी (शिवाजीनगर) जवळच्या डोंगर पायथ्याशी ग्रामस्थांमार्फत जलसंधारणाचे सुरू असलेल्या कामाला शुक्रवारी सकाळी स्थानिक आदिवासींनी विरोध केला. तसेच गलूर-गोफण आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवित कार्यकर्त्यांच्या गाड्यांची मोडतोड, जाळपोळ केली. या हल्ल्यात सात कार्यकर्ते जखमी झाले आहेत. मात्र याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
भाऊराव राघो चव्हाण, जिजाबाई भाऊराव चव्हाण, सुरेखा दगू मते, संतोष बबन मते, सागर शिवाजी कावळे आदी ग्रामस्थ आणि जेसीबी ऑपरेटर मोटू प्रमाद व त्याचा सहकारी मुन्ना शहा अशी यातील गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणासाठी नाशिक येथील दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले होते. मात्र सुमारे १५० ते २०० आदिवासी त्याच जागेवर ठिय्या मांडून होते.
मतेवाडी (शिवाजीनगर) शिवारात वनविभागाच्या हद्दीत स्थानिक नागरिकांनी गेल्या २० ते २२ दिवसांपासून जलयुक्त शिवारचे काम हाती घेतले होते. या कामास स्थानिक आदिवासींनी विरोध दर्शविला होता. मात्र समझोता होऊन डोंगराच्या बाजूला चर घ्यावा असे ठरले होते.मतेवाडी शिवारात श्रमदानाने बांध बांधण्याचे काम सुरू होते. वनविभागाच्या जमिनीत हा बांध घ्यायचा होता. मात्र दोन दिवसांपूर्वी आदिवासींनी हरकत घेतली होती. डोंगराच्या वरच्या बाजूला हा बांध घ्यावा असे त्यांनीच सांगितले होते. - रेखा योगेश ढोमसे, सरपंच, मतेवाडी.