आदिवासींना डबक्याचा आधार
By admin | Published: April 7, 2015 10:42 PM2015-04-07T22:42:45+5:302015-04-07T22:42:45+5:30
माथेरानमधील डोंगराच्या मध्य भागात असलेल्या आदिवासी वाड्यांमधील लोक गेल्या महिन्यापासून डबक्यातील पाणी पीत आहेत.
विजय मांडे, कर्जत
माथेरानमधील डोंगराच्या मध्य भागात असलेल्या आदिवासी वाड्यांमधील लोक गेल्या महिन्यापासून डबक्यातील पाणी पीत आहेत. कर्जत तालुक्यातील सहा आदिवासी वाड्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. परिसरातील विहिरी पूर्णपणे आटल्या असून कर्जत पंचायत समिती त्याकडे डोळेझाक करत असल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.
माथेरान डोंगराच्या मधल्या पट्ट्यात असलेल्या बारापैकी सहा आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेमार्फत या सहा वाड्यांमधील पाणी प्रश्न सुटावा, म्हणून विविध चार ठिकाणी विहिरी खोदल्या. त्या सर्व विहिरी दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यात आटल्या आहेत. त्यामुळे सर्वांना डोंगर कपरीचा आधार घ्यावा लागत आहे. कारण डोंगरातील दगडामधून पाणी झिरपत असते आणि ते पाणी गोळा करून नेण्याची कसरत आदिवासी महिलांना करावी लागत आहे. लग्नकार्य असेल तर या सर्व आदिवासी लोकांना तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पाली- भूतिवली धरणातून डोक्यावरून पाणी वाहून आणावे लागते. ते अंतर सपाटीचे नसून येताना पूर्णपणे उताराचे आणि पाणी घेवून जाताना चढावाचे आहे.
तालुक्यातील आसलवाडी, नान्याचा माळ, मन्याचा माळ, बोरीचीवाडी, भुतिवलीवाडी आणि धामनदंड अशा सहा आदिवासी वाड्यांमध्ये आहे. या सहा वाड्यांतील लोकांसाठी चार विहिरी खोदल्या आहेत, परंतु आज त्यात थेंबभर पाणी नाही. या सर्व वाड्यांमध्ये २६0 घरे असताना स्वतंत्र नळपाणी योजना नसल्याने आताचा अपवाद वगळता इतर दिवशी देखील किमान ५00 मीटर अंतर आदिवासी महिलांना पार करावे लागते. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील हंडा खाली येण्याची शक्यता फार कमी आहे. अशावेळी त्या भागातील आदिवासी महिलांनी डोंगरातील पाणी गोळा करून ही परिस्थिती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आठ दिवसांत आदिवासी वाड्यांमध्ये टँकरचे पाणी आले नाही, तर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संघटनेचे सचिव सुनील पारधी यांनी दिला आहे.