आदिवासी बांधवांचा एल्गार कशासाठी? विविध मागण्यांसाठी मंत्री के.सी.पाडवी यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 01:36 PM2022-03-07T13:36:30+5:302022-03-07T13:37:04+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी बांधवांनी एल्गार करत आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केले.
मुंबई: महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, कामकाजाची सुरुवात वादळी झाल्याचे सांगितले जात आहे. नवाब मलिकांच्या मागणीवर विरोधक ठाम असून, आजही विधासभेच्या पायऱ्यावर बसून ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यातच आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी बांधवांनी एल्गार करत आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन केले.
आमच्या विविध मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, धुळेसह राज्यातील ठिकठिकाणाहून आदिवासी बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. पुरूषांसह महिला आदिवासी बांधव देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेत या सर्व मागण्या मांडता याव्या यासाठी सर्व आदिवासी बांधव एकत्र आलेत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी दिली असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने केलेला वनहक्क जमीन कायद्याची अंमलबजावणी करावी. आदिवासी बांधवांना न्याय मिळायला हवा. त्यांच्या जमिनी काढून घेण्याचे षडयंत्र केले जात आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करूनही न्याय मिळत नाही. वनविभाग दादागिरी करत असेल, तर या सरकारविरोधात लढा देऊ, राज्यातील कायद्याची अंमलबजावणी केंद्राप्रमाणे झाली पाहिजे, अशी मागणी असल्याचे प्रतिभा शिंदे यांनी यावेळी सांगितले.