Join us

सवरांना आदिवासी विकास, सामाजिक न्याय खाते

By admin | Published: November 03, 2014 12:19 AM

सवरा यांना आदिवासी विकास याव्यतिरिक्त सामाजिक न्याय या महत्त्वाच्या खात्याचा अतिरिक्त लाभ झाला आहे.

ठाणे /पालघर : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले असून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड मतदारसंघातून विजयी झालेल्या व कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झालेल्या विष्णू सवरा यांना आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय अशा दोन महत्त्वपूर्ण खात्यांचा लाभ झाला आहे. सवरा यांना आदिवासी विकास याव्यतिरिक्त सामाजिक न्याय या महत्त्वाच्या खात्याचा अतिरिक्त लाभ झाला आहे.सवरा यांना केवळ आदिवासी विकास या एकाच खात्याचा कार्यभार देण्याबरोबर अन्य एखादे वजनदार खाते दिले जावे, अशी मागणी पालघर जिल्ह्यातील भाजपाचे नेते व कार्यकर्ते यांनी केल्याचे वृत्त लोकमतने रविवारच्या अंकात हेड लाइनच्या स्वरूपात प्रसिद्ध केले होते, ते शंभर टक्के खरे ठरले.आदिवासी आमदाराने फक्त आदिवासी कल्याण खातेच सांभाळावे काय? अन्य खात्यांचा कारभार करण्याची क्षमता त्यांच्यात नाही काय, असा सरकारचा समज आहे काय? तसा नसेल तर या सरकारने सवरा यांना महत्त्वाचे खाते द्यावे किंवा आदिवासी विकास यासोबत आणखी एखादे महत्त्वपूर्ण खाते द्यावे, असा या मागणीचा सूर होता. त्यानुसार, सवरांना आता दोन खाती मिळाली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील त्यांचे आणि सरकार व प्रशासनामधील पालघर जिल्ह्याचे महत्त्व वाढले आहे. अडीच महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या नव्या जिल्ह्याचा आणि पाच वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या विक्रमगड या नव्या विधानसभा मतदारसंघाचाही यारूपाने गौरव झाला आहे. या बहुमानाबाबत सवरा यांचे संपूर्ण जिल्ह्यात अभिनंदन केले जात आहे.