लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी पाताचे पाणी, अकराची भट्टी, चुना पाडा, तुमनी पाडा, नवापाडा, राजनी पाडा, माळी क्वार्टर्स, डॅम पाडा, चिंचपाडा, तलाव पाडा, रामनगर, केतकी पाडा आदी १३ पाड्यांवरील आदिवासींना आजतागायत पिण्याचे पाणी, वीज, शौचालये अशा मूलभूत पण प्राथमिक गरजेच्या सुविधाही मिळालेल्या नाहीत. परिणामी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाड्यांवरील आदिवासी २६ जानेवारी रोजी उद्यानाच्या गेटवर उपोषणाला बसणार आहेत.
पाड्यांवर महापालिकेच्या वतीने पाण्याची जोडणी देण्यात यावी, आदिवासी कुटुंबांना मीटर बसून वीजपुरवठा करण्यात यावा, शौचालयांची व्यवस्था करावी, पायवाटा मुख्य रस्त्याला जोडून वाहतुकीची सोय करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. आदिवासींना घरांच्या दुरुस्तीसाठी परवानगीही मिळू शकत नाही, त्यामुळे अशा परवानगीची अट रद्द करावी, अशी मागणी केली आहे. उद्यान परिसरातील आदिवासी पाड्याशिवाय असलेल्या वस्त्यांमधील १९९५ पूर्वीच्या झोपड्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यांतर्गत पुनर्वसन करण्यात यावे, अशा मागण्या केल्या आहेत, अशी माहिती बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र ठाकूर, सचिव प्रमोद शिंदे यांनी दिली.