बिरवाडी : मार्च अखेरपासून महाड तालुक्यातील बहुतांशी आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या उद्भवते. तर काही ठिकाणी राजकीय वादावादीमुळे कृत्रिम पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत असल्याचे शिरगाव येथील आदिवासींच्या बैठकीमध्ये उघड झाले. तालुक्यातील आदिवासींच्या समस्या जाणून घेण्याकरिता सोमवारी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये शिरगाव प्राथमिक शाळेच्या प्रांगणात तालुक्यातील प्रमुख आदिवासी प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित आदिवासींनी आपल्या वाड्यांतून पिण्याच्या पाण्याच्या समस्येबरोबर इतर समस्यांचा पाढा वाचला. या बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. महाड तालुक्यात ७३ आदिवासी वाड्या आहेत. बहुतांशी वाड्यांना स्थानिक पाणी समितीच्या राजकारणामुळे पाणी दिले जात नसल्याची तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली. शिरगाव ग्रामपंचायतीतील आदिवासी वाड्यांतून पंचायत पाणीपट्टी वसूल करते परंतु चार चार दिवस पाणी दिले जात नसल्याचे ग्रामस्थ बेंडू वाघमारे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. शिरगाव आदिवासी वाडीकरिता पाच लाख रूपये खर्च करून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु वाडीमध्ये पाणीच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)कोट्यवधींचा खर्च ४तालुक्यांमध्ये अनेक शासकीय योजना कार्यान्वित केल्या जातात, त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्या आदिवासींपर्यंत पोहोचविल्या जात नाहीत. याबाबत सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली. शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी त्या आदिवासींपर्यंत पोहोचत नसल्याचे समोर येत आहे. रोहेकर पिताहेत गढूळ पाणी; जॅकवेलजवळ गाळ४रोहा : नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरात गेले काही दिवस पाणीटंचाईसोबतच आता मातीमिश्रित अस्वच्छ पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. गेले चार दिवस रोहेकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे.४काही दिवस शहरात पाणीटंचाई सुरू होती. शुक्रवारपासून पाणीपुरवठा सुरू झाला.त्यामुळे नागरिकाची या पाणीटंचाईतून सुटका झाली म्हणून समाधान व्यक्त केले. परंतु हे समाधान क्षणिक होते. नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा चक्क मातीमिश्रित आणि चिखलयुक्त गढूळ होता. ४डोलवहाळ धरणाचा पाणीसाठा आटल्याने जॅकवेलजवळील गाळ उचलला नसल्याने कृत्रिम पाणीटंचाईला रोहेकरांना तोंड द्यावे लागले. शहरासाठी असलेल्या साठवण टाकीत आधी शुद्धीकरण करून नंतरच पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. मात्र गाळ तसाच असल्याने गढूळ पाणी येत आहे.
जिल्ह्यात आदिवासी वाड्या तहानलेल्या
By admin | Published: April 13, 2015 10:25 PM