जव्हार ग्रामीण : स्वातंत्र्याची ६८ वर्षे उलटून गेली तरी जव्हार तालुक्यातील आदिवासींना मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. बहुतांश आदिवासी जनता ही डोंगराळ भागातील कड्याकपारीत राहते. परंतु आजही अनेक गाव पाड्यांमध्ये वीज नाही. येथील जनतेने वारंवार पाठपुरावा करूनही महावितरणने त्यांच्या मागणीची कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही. अंधारामुळे जंगली श्वापदे घरात घुसण्याचा धोका असतो. परंतु या गंभीर बाबीकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत वावर-वांगणी पैकी रिडीपाडा, आरोळीपाडा, तर बोपदरिपैकी पायबड, गोंडपाडा, माडवाचा गाव तर दाभलोन मधील राहदेपाडा, निरपोनीचा पाडा, ग्रामपंचायत खरोंडा व तिलोंडा पैकी नंबरेपाडा, दुलरणपाडा, सुकाळीचा माळ, आणि ग्रामपंचायत झात मधील मनमोहडी, हेदोली हे १२ पाडे असून यांची १ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. या पाड्यातील नागरीकांनी वीजजोडणीसाठी वर्षानुवर्षे वीज कार्यालयाकडे लेखी निवेदने दिली मात्र आजही या गावपाड्यांना नवीन वीजजोडणी दिलेली नसल्याने येथील आदिवासींना अंधारात जीवन जगावे लागत आहे.या बारा गाव पाड्यांना जोडणारे रस्ते व्यवस्थित नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रत्येक पाड्यात इयत्ता ४ थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहेत. मात्र येथील विद्यार्थ्यांना दिव्याचा आधार घेत आपला अभ्यास पूर्ण करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. नवीन पालघर जिल्ह्याकडून तरी आपल्याला वीज जोडणी मिळेल या आशेने पुन्हा पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे वीज जोडणीसाठी मागणी केली आहे. (वार्ताहर)
जव्हार मधील आदिवासी गावे आजही अंधारात
By admin | Published: April 02, 2015 11:00 PM