बीडमध्ये आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण; काँग्रेसचा संताप, गृहमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 03:13 PM2023-10-23T15:13:12+5:302023-10-23T15:14:37+5:30
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही ट्विट करुन गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
मुंबई - बीडमध्ये एका भाजप आमदाराच्या पत्नीकडून मारहाण झाल्याचा आरोप करत एका महिलेने पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरुन, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराच्या पत्नीसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. भाजप आमदाराच्या पत्नीचं या गुन्ह्यात नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदाराच्या पत्नीकडून आदिवासी पारधी शेतकरी कुटुंबाला धमकविल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन, आता काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही ट्विट करुन गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
जमिनीवर ताबा घेण्याच्या उद्देशाने एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाळुंज (ता.आष्टी ) येथे उघडकीस आली. या प्रकरणात विधान परिषदेचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघाविरुद्ध विनयभंग अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा प्रकार घडल्याचा आरोप पीडितेनं तक्रारीत केला. सदर घटनेची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. आता, काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत ट्विट करण्यात आलं आहे. त्यानंतर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही ट्विट करुन गृहमंत्र्यांकडे संबंधित प्रकरणात पक्षहित बाजुला ठेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश, मणिपूरमध्ये हेच घडलं होत, आता महाराष्ट्रात सुद्धा तेच. भाजपशासित राज्यात आदिवासींवर अत्याचार करणारी भाजपचीच टीम तयार होत आहे. बीडमध्ये एका आदिवासी महिलेला भाजप आमदाराच्या पत्नीने विवस्त्र करून मारहाण केली. आदिवासी महिला स्वत:ला वाचवण्यासाठी रस्त्यावर नग्नावस्थेत धावत राहिली. या प्रकरणात दोषी असलेल्या भाजप आमदारावर आणि त्यांच्या पत्नीवर गृहमंत्री यांनी पक्षहित बाजूला ठेवून कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे ट्विट वडेट्टीवार यांनी केले आहे. तसेच, ही घटना लज्जास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं.
लज्जास्पद!
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 23, 2023
मध्यप्रदेश, मणिपूरमध्ये हेच घडलं होत, आता महाराष्ट्रात सुद्धा तेच. भाजपशासित राज्यात आदिवासींवर अत्याचार करणारी भाजपचीच टीम तयार होत आहे.
बीडमध्ये एका आदिवासी महिलेला भाजप आमदाराच्या पत्नीने विवस्त्र करून मारहाण केली. आदिवासी महिला स्वत:ला वाचवण्यासाठी रस्त्यावर… https://t.co/3sHW6Rswdf
दरम्यान, काँग्रेसने भाजपावर निशाणा साधताना, भाजपाशासित राज्यात आदिवासी महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. याप्रकरणी दोषींवर कडक शासन करावे, अशी आमची मागणी असल्याचंही काँग्रेसने म्हटलं आहे.