आदिवासींनी तहसीलसमोर केला आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Published: January 5, 2015 10:34 PM2015-01-05T22:34:25+5:302015-01-05T22:34:25+5:30
विभागामध्ये तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने उद्विग्न झालेल्या तक्रारदारांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मनोर : पालघरच्या सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी यांनी किसान रोपवाटीका योजनेतून आदिवासी मजुरांची लाखो रू. ची रक्कम हडप केल्याप्रकरणी दोन वर्षापासून सर्व विभागामध्ये तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने उद्विग्न झालेल्या तक्रारदारांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.
पालघर येथील सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी भास्कर विठ्ठल कांबळे यांनी मौजे टेन येथील रोपवाटीकेत माती, शेणखत यांच्या पिशव्या भरण्यासाठी तक्रारदारांकडे मजुराची मागणी केली. यावेळी मजूर उपस्थित नसल्याने त्यांनी शाळेतील अल्पवयीन मुलांना पैशाचे आमिष दाखवून नऊ दिवस काम करुन घेत सुमारे ५० हजार पिशव्या भरून घेतल्या. सरकारी नियमाप्रमाणे प्रती पिशवी ५० पैसे दर असताना त्यांना २० पैसे अदा करीत त्यांची बोळवण केली व त्या रक्कमेच्या पावत्यावर मुलांच्या पालकांची सह्या घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आदिवासी विभागातील रोजगार निर्माण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने रोपवाटीका तयार करण्यासाठी कांबळे यांनी माजी उपसरपंच महेंद्र दुमडा यांना सांगितले व तसा करारही केला. त्याप्रमाणे ५ जुलै २०१३ रोजी उपसरपंचाकडून १५ हजार ५०० रोपेही नेण्यात आली. मात्र आजपर्यंत त्याचे पैसे देण्यात आलेले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लागवड अधिकारी कांबळे यांनी आपण रोपवाटीकेचे पैसे देतो असे भासवून आॅगस्ट ते सप्टेंबर २०११ साली टेण गावातील रोपवाटीकेत वॉचमन म्हणून कार्यरत असल्याचे खोट्या कागदपत्रानुसार भासवून दुमाडा यांच्या नावाने १० हजार ८४७ रू. रोख घेतल्याच्या दस्ताएैवजांवर सह्या घेतल्या. तसेच इन्कमटॅक्सची भीती दाखवून पालघरच्या बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत नेऊन माझ्या नावावर १० डिसेंबर २०१२ रोजी ११ हजार ८७४ रू. चे दोन चेक मिळून एकूण २३ हजार ७८४ रू. जमा केले व नंतर त्यांतील २३ हजार ७०० रू. लागलीच काढून घेतले. अशा बऱ्याच रक्कम काढीत जवळपास ५० हजार रू. ची रक्कम काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. किसान रोपवाटीका योजनेअंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची व्याप्ती एकुण मोठी असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे असून यासंदर्भात जाब विचारणा करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अरे तुमचे कुठे खाल्ले? मी शासनाचे खाल्ले असे बेपर्वा उत्तर दिले. या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी मागील दोन वर्षापासून करीत असूनही या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने उद्विग्न झालेल्या दुमाडा, जानु कालात यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी त्यांना रोखले .