जिवंत व्यक्तीला श्रद्धांजली; नाट्य परिषदेचा ‘पराक्रम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:07 AM2018-06-14T01:07:36+5:302018-06-14T01:07:36+5:30
जिवंत असलेल्या कलावंताला श्रद्धांजली वाहण्याचा ‘पराक्रम’ नाट्यसंमेलनात बुधवारी मध्यवर्ती नाट्य परिषदेने केला. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार यांचे छायाचित्र दिवंगतांमध्ये टाकून त्यांना हयातीतच परलोकाची सफर घडवण्यात आली.
मुंबई + जिवंत असलेल्या कलावंताला श्रद्धांजली वाहण्याचा ‘पराक्रम’ नाट्यसंमेलनात बुधवारी मध्यवर्ती नाट्य परिषदेने केला. ज्येष्ठ गायक आणि अभिनेते प्रसाद सावकार यांचे छायाचित्र दिवंगतांमध्ये टाकून त्यांना हयातीतच परलोकाची सफर घडवण्यात आली.
नाट्य परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांच्या लक्षात कोणीतरी ही गोष्ट आणून दिल्यानंतर हे छायाचित्र हटविण्यात आले.रंगभूमीवरील काळाच्या पडद्याआड गेलेल्या कलावंतांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांची छायाचित्रे संकुलात लावण्यात आली आहेत. त्या यादीत प्रसाद सावकार यांचे छायाचित्र सुरुवातीलाच लावण्यात आले होते, ते पाहून अनेकांनी कपाळावर हात मारला.
कुणीतरी सावकार यांनाही ही गोष्ट कळविली. त्यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. मात्र, मध्यवर्ती नाट्य परिषदेने शहानिशा न करता, सावकार यांचेच निधन झाल्याच्या समजुतीतून त्यांचे छायाचित्र दिवंगतांच्या यादीत टाकून त्यांना हयात असतानाच श्रद्धांजली वाहण्याचा पराक्रम केला. गेल्यावर्षी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यातर्फे माजी संमेलनाध्यक्ष रा. ग. जाधव हे दिवंगत झाल्यावर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र पाठवण्यात आले होते. यावरून त्यांची खिल्ली उडविण्यात आली होती. मुलुंडच्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष तावडे हेच आहेत. हयात व्यक्तीला जिवंतपणी श्रद्धांजली देणे हा अक्षम्य गुन्हा असल्याची कडवट टीका कलावंत आणि रसिकांनी केली.