Join us

कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:06 AM

मुंबई : कारगिल विजय दिनानिमित्त सोमवारी मुंबईच्या कुलाबा येथील शहीद स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. आजच्या २२व्या ...

मुंबई : कारगिल विजय दिनानिमित्त सोमवारी मुंबईच्या कुलाबा येथील शहीद स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. आजच्या २२व्या कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण दलांच्या विजयाच्या स्मरणार्थ आणि हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानास आदरांजली म्हणून तिन्ही दलांकडून मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी शहीद स्मारकावर मान्यवरांकडून पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या समारंभात नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल आर. हरि कुमार यांनी प्रथम पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर लेफ्टनंट जनरल एस. के. प्रशर, रिअर अ‍ॅडमिरल अतुल आनंद, ग्रुप कॅप्टन जितेंद्र दिनकर मसुरकर यांच्यासह तिन्ही सैन्य दलातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

कारगिलचे युद्ध हे समुद्र सपाटीपासून १६ हजार फूट उंचीवर लढले गेले. पर्वत शिखरांवर घुसखोरी करून बसलेल्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धूळ चारली. जगातील सर्वात प्रतिकूल प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाखच्या कारगिल - द्रास क्षेत्रातील शौर्य आणि पराक्रमाची गाथा म्हणून दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. खराब हवामानात बर्फाच्छादित शिखरांच्या तीव्र उतारावर भारतीय जवानांनी आपल्या चिकाटी आणि शौर्याने शत्रूचे मनसुबे उधळून लावले आणि घुसखोरांना भारत भूमीतून हद्दपार केले. त्याची आठवण म्हणून कारगिल दिवस साजरा केला जातो.

फोटो आहे - कारगिल

फोटो ओळ - कारगिल विजय दिनानिमित्त सोमवारी मुंबईच्या कुलाबा येथील शहीद स्मारकात पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.