Join us  

श्रद्धांजली: सदाबहार सदाफुली दीपाताई गोवारीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:42 PM

आजीच्या गोष्टी, खसखस आणि खुसखुस, किटकिट नगरीत पीटपीट राजा, तळ्याकाठी मळ्याकाठी अशा एकापेक्षा एक सरस विनोदी कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका दीपाताई गोवारीकर यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. दीपाताईंच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा हा श्रद्धांजलीपर लेख...

- वासंती फडकेआजीच्या गोष्टी, खसखस आणि खुसखुस, किटकिट नगरीत पीटपीट राजा, तळ्याकाठी मळ्याकाठी अशा एकापेक्षा एक सरस विनोदी कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका दीपाताई गोवारीकर यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. दीपाताईंच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारा हा श्रद्धांजलीपर लेख...

८ नोव्हेंबर २०२२. सकाळीच दीपाताई गोवारीकरांना स्ट्रोक आल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याची व त्यापाठोपाठ तासाभराने त्यांचे निधन झाल्याची बातमी कानावर येऊन थडकली. मध्यंतरी एकदा असेच झाल्याने त्या रुग्णालयाची वारी करून परतल्या होत्या. अलीकडे मात्र त्या नेमाने साहित्य सहवासच्या कट्ट्यावर येत नव्हत्या. पाऊस कमी झाल्यावर अजय मला म्हणाला होता, मावशी तुम्ही एकदा दीपाताईंची कट्ट्यावर मुलाखत घ्या, ते राहूनच गेले.दीपाताई उंच, धिप्पाड, गोरा रंग, गोल चेहरा. आता केसांचा कापूस झाला असला तरी कधीतरी त्यांचे केस काळेभोर होते. वयाच्या ८९ व्या वर्षीही त्यांचा चेहरा सुरकुतलेला नव्हता. विनोदी लेखिका म्हणून त्या एकेकाळी प्रसिद्ध होत्या. काही महिन्यांपूर्वी पुण्याच्या साहित्य परिषदेने ‘आजीच्या गोष्टी’ या त्यांच्या विनोदी पुस्तकाच्या निमित्ताने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. दीपाताईंचे बालपण कऱ्हाडमध्ये गेले होते. तिथली मंदिरे, सणसमारंभ, मैत्रिणींच्या आठवणी त्या सतत सांगत असत. त्यांची माली नावाची एक मैत्रीण रत्नागिरीला राहत होती. तिचे घर, तिच्या हातच्या सुबक मोदकांचे वर्णन त्या अगदी रंगून सांगत असत. आई, वकील असलेले वडील, त्यांच्याकडे येणारी अशिलं यांच्याबद्दल बोलतच असत पण यशवंतराव चव्हाणांबद्दल त्या नेहमीच अतिशय आदराने बोलत. ते ब्राह्मणद्वेष्टे नव्हते असे ठासून सांगत असत. दीपाताईंनी तरुणपणात मराठीबरोबरच इंग्रजीतील बरेच लेखक वाचले होते. ‘ॲना कॅरेनिना’तील प्रारंभीची दोन वाक्य ‘हॅपी फॅमिलीज आर अलाइक; एव्हरी अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इट्स ओन वे’ त्यांच्या तोंडी नेहमी असत. कविता, श्लोक यासह हिंदी, मराठी सिनेमातील गाणी दीपाताई छान म्हणत असत. रागदारी संगीताची त्यांना जाण होती. त्यांचा विनोद प्रसंगनिष्ठ होता. एकदा पुण्याच्या मैत्रिणींनी जेवण झाल्यावर नवऱ्याचे नव्हे तर आपल्या मनीच्या पुरुषाचे नाव घ्यायचे ठरवले. एकीने रॉक हडसन तर दुसरीने असेच काहीतरी घेतले. शेवटी एका महिलेने एका अभिनेत्याचे नाव घेतले. मात्र, तो निघाला समलिंगी, अशा गमतीजमतीही घडताना त्या खुलून सांगत. दीपाताईंचे रागलोभही तीव्र होते. एका वर्षी ३१ डिसेंबर साजरा करायला दीपाताईंच्या घरी आम्ही सारे जमलो होतो. खाणे- पिणे मजेत झाले. मध्यरात्री बाराचे फटाके ऐकल्यावर घरी जाताना एकीने म्हटले, आज स्वीट डिश नव्हतीच. काजूकतली होती. बोलणारीच्या डोक्यात श्रीखंड, गुलाबजाम इत्यादी म्हणजेच स्वीट असे असावे. या छोट्याशा शेऱ्यानं दीपाताईंचा हिरमोड झाला. बोलणारीने दुसऱ्या दिवशी चारचौघांदेखत त्याचा पुनरुच्चार केला. त्यांचा राग अनावर झाला. एकदा असेच कोणाकडे गेल्या असताना त्या बाईने भेटायला येण्याची गरज नाही असे सांगितले तेही त्या कधी विसरू शकल्या नाहीत. तो किस्सा सांगतानाही त्यांचा आवाज चढत असे. आता दीपाताई पंचमहाभूतात विलीन झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या सुखद आठवणी मागे राहिलेल्यांच्या मनात सदैव रुंजी घालत राहतील. 

टॅग्स :मुंबई